विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी कलम 188 मोठा अडथळा असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंध:कारमय होताना दिसत आहे.
सोलापूर : राज्यभरात कोरोना (Covid-19) काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो व्यक्तींविरोधात पोलिसांनी कारवाई (Police Action) केलीय. पोलिसांनी केलेल्या या कारवाईद्वारे केवळ कोट्यवधींचा दंडच वसूल केला गेला नाही तर हजारो लोकांवर पोलिसांनी गुन्हे (Crime) देखील दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भादंवि कलम 188 (Section 188) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आता सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतोय. शिवाय शिक्षण व नोकरीसाठी परराष्ट्राला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी कलम 188 मोठा अडथळा असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंध:कारमय होताना दिसत आहे.
केवळ सोलापूर शहराचा जरी विचार केला तरी पोलिसांनी हजारो गुन्हे कोरोना काळात दाखल केले आहेत. कोरोना काळात नियमांचा भंग केल्या प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी पाच हजार 30 गुन्हे दाखल केले आहेत. या माध्यमातून 11 हजारपेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ गुन्हेच नाही तर मास्क न वापरलेल्या लोकांना एक कोटी 96 लाखांचा दंड देखील सोलापूर पोलिसांनी केला आहे.
सोलापूर शहरातील अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या राकेशला इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीतून नोकरीची ऑफर आली. दारिद्य्र पाचवीला पूजलेलं असताना मोठ्या कंपनीतून आलेली नोकरीची ऑफर आनंद देणारी होती; मात्र मात्र कोरोना काळात केवळ दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे दाखल झालेल्या एका गुन्ह्यामुळे राकेशला नोकरी मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
याबाबत ऍड. रियाज शेख म्हणाले, शैक्षणिक दाखले, पासपोर्ट, नोकरीच्या ठिकाणी अनेकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. मात्र कलम 188 नुसार गुन्हे दाखल असल्याने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. राजकीय किंवा सामाजिक आंदोलने करत असताना दाखल झालेले किरकोळ गुन्हे राज्य शासनाच्या आदेशानुसार काही वर्षांनी रद्द केले जातात. त्याच पद्धतीने हे गुन्हे देखील माघारी घेण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
सोलापुरातील इंदिरा वसाहत परिसरात राकेश आपल्या आजी सोबत राहतो. मागच्या वर्षी आजोबांना न्यूमोनिया झाला होता. आजीला चालता येत नाही. सकाळी चहासाठी दूध आणायला राकेश घराबाहेर पडला. दुधाची पिशवी घेतली. मात्र घराकडे येताना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना विणवण्या केल्या मात्र एका शब्दानेही पोलिसांनी ऐकलं नाही. त्यामुळे आता राकेशचं संपूर्ण भविष्यच धोक्यात आलं आहे. ही व्यथा एकट्या राकेशची नाही तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यात 188 कलमामुळे मोठ्या संकटात आले आहे.
गुन्हेगारांचा गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट व्हावी या हेतूने गुन्हे दाखल केले जातात. मात्र कोरोना नियमांचा भंग केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे तरुणांचे भविष्यच टांगणीला लागले आहे. त्यामुळे राज्य शासनाने कायद्याचा धाक निर्माण करत असताना या तरुणांच्या भविष्याचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
- ऍड. रियाज शेख
बातमीदार : विश्वभूषण लिमये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.