प्रसिद्ध कवी, गीतकार, जेष्ठ साहित्यिक आणि माजी आमदार ना. धों. महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या पळसखेड या त्यांच्या मूळगावी उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...
ना.धों. महानोर यांचा जन्म औरंगाबाद (सध्याच्या छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यातील पळसखेड या गावी १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी जळगाव गाठले पण ते महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंतच शिकले. त्यानंतर शिक्षण सोडून ते गावाकडे शेती करण्यासाठी परतले. शेती करता करता त्यांनी कविता लिहायला सुरूवात केली.
मराठी साहित्यविश्वामध्ये ते रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये बालकवींचा प्रभाव जाणवतो. त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्याचा वारसा समृद्ध केला. त्यांचे अनेक कवितासंग्रह गाजलेले आहेत. ‘पानझड’, ‘तिची कहाणी', 'पळसखेडची गाणी, ‘रानातल्या कविता' म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच.
त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिली आहेत. "दूरच्या रानात केळीच्या वनात" हे त्यांनी लिहिलेले गाणे चांगलेच प्रसिद्ध आहे. रानातल्या कविता, पही, गांधारी ह्या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले आहे.
पुढे महानोर १९७८ साली महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर नियुक्त झाले. त्यानंतर त्यांचा शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत जवळचा संबंध आला. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींवरही त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत.
त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य
शरद पवार आणि मी
रानातल्या कविता
शेती आत्मनाश व संजीवन
यशवंतराव चव्हाण आणि मी
पु. ल. देशपांडे आणि मी
यशवंतराव चव्हाण
या शेताने लळा लाविला
पावसाळी कविता
पानझड
पळसखेडची गाणी
दिवेलागणीची वेळ
त्या आठवणींचा झोका
पक्षांचे लक्ष थवे
गावातल्या गोष्टी
गपसप
अजिंठा
कापूस
जगाला प्रेम अर्पावे
गंगा वाहू दे निर्मळ
त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
साहित्य अकादमी पुरस्कार - पानझड कवितासंग्रह
मराठवाडा भूषण
भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार
जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार
कृषीभूषण पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
'वनश्री' (पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल)
'कृषिरत्न' (शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्णपदक)
डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार
महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
२२ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
२४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.
२००३ मध्ये झालेल्या पहिल्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष
२५ ते २७ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.