सोलापूर : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विमा संरक्षित क्षेत्राला नुकसानभरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस ७२ तासांत कळविणे, आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे. त्यात अक्कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर या तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. विमा कंपनीकडून त्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीपमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत खरीपमध्ये जिल्ह्यातील सात लाख ३३ हजार ३०३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसानभरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे.
नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकाचा वापर करावा लागतो. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका, कांदा, भुईमूग, तूर, खरीप ज्वारी, उडीद, मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडून विमा कंपनीला सरकारचा हिस्सा दिला जाईल. पण, परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय बाधित शेतकरी
तालुका शेतकरी
बार्शी ३८,४६१
अक्कलकोट ३२,५६२
माढा १४,४१९
मंगळवेढा १०,१२१
उत्तर सोलापूर ८८०३
दक्षिण सोलापूर ६,४५७
करमाळा ६,२०६
मोहोळ ४,८१२
माळशिरस ३८५
पंढरपूर ४३२
सांगोला २०२५
एकूण १,२४,६८३
पंचनाम्यानंतर बाधितांना विमा कंपनीकडून मिळेल भरपाई
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीतर्फे सुरू असून त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी देखील आहेत. पंचनाम्याचा अहवाल विमा कंपनीला सादर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्याना कंपनीकडून भरपाई दिली जाते. बाधित शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळेल, यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.