Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Video : जिथे काकांच्या सभा तिथेच पुतण्याचा आवाज; हा योगायोग आहे? की...

Komal Jadhav (कोमल जाधव)

राष्ट्रवादी पक्षातल्या फुटीनंतर शरद पवारांची साथ सोडून आणि बहुसंख्य आमदारांच्या जोरावर अजित पवारांनी सत्तेत भागीदारी मिळवली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात लढाई सुरु आहे.

अशातच आपला पक्ष फुटला नसून काहींनी वेगळी भूमिका घेतल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्षाविरोधी भूमिका घेतलेल्यांच्या मतदारसंघात जाऊन पवार सभा घेताहेत आणि आपलं पक्षसंघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करताहेत. तर दुसरीकडे आपण प्रत्युत्तर सभा घेत नसल्याचं सांगतानाच अजित पवार मात्र पवारांच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसताहेत. कारण, पवार जिथे सभा घेताहेत तिथेच अजितदादाही सभा घेताहेत. त्यामुळे अजितदादा पवारांना फॉलो करतायत का?

आपण पवारांना उत्तर देण्यासाठी सभा घेत नसल्याचं अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येतं. पण, वास्तवात बीड आणि कोल्हापुरात पवारांनंतर अजित पवार गटाच्या सभा झाल्या. म्हणजे १७ ऑगस्टच्या पवारांच्या बीडमधील सभेला मिळालेल्या प्रतिसादाची चर्चा राज्यभर झाली. त्यानंतर २७ ऑगस्टला अजित पवारांचीही बीडमध्ये सभा झाली. ज्याचं नियोजन आणि आयोजन धनंजय मुंडेंनी केलं होतं. इथेही पवारांच्या सभेतून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यांना अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडेंकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी मुंडेंनी तर थेट साहेबांनी बीडला काय दिलं? म्हणत शरद पवारांवरच सवाल उपस्थित केलेला दिसला.

दुसरीकडे २५ ऑगस्टला कोल्हापुरात पवारांची सभा झाली; ज्याला खुद्द शाहू महाराज छत्रपतींनी हजेरी लावली होती. या सभेत आव्हाड विरुद्ध मुश्रीफ संघर्षही पेटलेला दिसला. त्यानंतर १० सप्टेंबरला म्हणजेच रविवारी अजित पवारांची कोल्हापुरातही सभा झाली. या सभेतून धनंजय मुंडेंनी पुन्हा पायताणाचा मुद्दा काढत आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं.

एकीकडे पवारांकडून जितेंद्र आव्हाड आणि अजितदादांकडून धनंजय मुंडेंमध्ये वाकयुद्ध रंगताना दिसलं.

आव्हाड, मुंडे, मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक रंगत असतानाच अजित पवार २०१४ पासूनच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन पवारांवर सवाल उपस्थित केलेले दिसतात. पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीसाठी आधी हिरवा कंदील दिला, नंतर माघार घ्यायला लावून गोची केल्याची भावनाही ते वारंवार आपल्या सभेतून मांडत असतात.

तर तिकडे पवार मात्र आपल्या गुगलीवर विकेट पडल्याची प्रतिक्रिया देतात. त्यामुळे हे पवार काका-पुतणे थेट एकमेकांविरोधात बोलत नसले तरी, राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी अजितदादांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाची पायरी चढलीए.

२ जुलैला अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासोबत इतर ८ जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, त्याआधी ३० जूनलाच एकूण ४० खासदार आणि आमदारांनी पाठिंबा देत आपल्याला एकमतानं राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्ष केल्याचा दावा करणारी याचिका अजितदादांनी निवडणूक आयोगात दाखल केली.

त्यानंतर निवडणूक आयोगानं पवारांकडे विचारणा केली होती. अजित पवारांच्या याचिकेसंदर्भात ७ सप्टेंबरला शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका विरोधाभासी असल्याचं पवारांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

त्यामुळे निवडणूक आयोगातल्या लढाईवर जरी पवार काका-पुतण्या बोलत नसले तरी, अजितदादांनाही पवारांच्या खेळीविषयी धास्ती दिसतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीए. कारण, पवार गटाकडून विधानसभेच्या अध्यक्षांनंतर विधानपरिषदेच्या सभापतींनाही अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांच्या निलंबनाविषयी पत्र लिहिण्यात आलंय. त्यामुळे आमदारकी वाचवण्यासाठी आमदारांचीही चांगलीच पळापळ होणार असल्याचं बोललं जातंय.

तर एकीकडून पवार अजित पवार गटाविरोधात कठोर भूमिका घेऊन पक्षावर आपली पकड असल्याचं दाखवून देताहेत. आणि त्याचप्रमाणे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचण्यासाठी थेट रस्तावर उतरलेले दिसताहेत. तर जिथे जिथे पवार सभा घेताहेत तिथे तिथे अजितदादांच्याही सभा घेताना दिसताहेत. आता बीड, कोल्हापूरनंतर अजित पवार जळगावातही सभा घेणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सिताराम घनदाट घेणार शरद पवारांची भेट

Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी भावांनी मागितली माफी,योजनेसाठी बनावट अर्ज केल्याने सहा जणांची चाैकशी

Sharad Pawar: आयाराम वाढवणार पवारांच टेंशन; या निष्ठावान नेत्याने दिला बंडखोरीचा इशारा

SCROLL FOR NEXT