नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारात अजित पवार यांची कोणतीही भूमिका नाही, तसेच पक्षावर कब्जा करण्यासाठी कट रचण्यात आला असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून शुक्रवारी निवडणूक आयोगात करण्यात आला. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे.
शरद पवार गटाकडून देवदत्त कामत आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी दोन तासांपेक्षा जास्त काळ युक्तिवाद केला. ज्या व्यक्तीने पक्षाची स्थापना केली, त्याला नावारूपाला आणले. त्या पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राष्ट्रीय अधिवेशनात जेव्हा शरद पवार यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्याचा प्रस्ताव जेव्हा आला, तेव्हा प्रफुल्ल पटेल हे प्रस्तावक होते, तर अजित पवार, सुनील तटकरे यांनी त्या प्रस्तावाला संमती दर्शवली होती. मग अचानक त्यांनी भूमिका का बदलली, यामागे पक्षावर कब्जा करणे हाच उद्देश होता, असे कामत म्हणाले.
अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यावर सर्वप्रथम सुनावणी घेतली जावी, अशी मागणी सिंघवी यांनी आयोगाकडे केली. बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आयपीसी अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जावेत, असे सिंघवी म्हणाले. सिंघवी यांच्या युक्तिवादाला जोड देत कामत यांनी निवडणूक आयोगासमोर २०१९ पासूनचा एकूण घटनाक्रम सांगितला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. पक्षाच्या विस्तारात अथवा संघटनेत अजित पवार यांची कोणतीही भूमिका नव्हती. केवळ सत्तेत सहभागी होत त्यांनी पक्षावर दावा ठोकला आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षपदासाठी प्रस्तावक असलेले प्रफुल्ल पटेल हेच आता पवारांची निवड बेकायदा असल्याचे सांगत आहेत. अधिवेशनात अध्यक्षपदासाठी एकमेव शरद पवार यांचे नाव आले होते. त्याआधारे त्यांची निवड झाली. दुसरा गट बनविल्यानंतर अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले. त्याला मान्यता दिली जाऊ शकत नाही, असे कामत युक्तिवादादरम्यान स्पष्ट केले.
दोन जुलैला अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी पक्षात कोणताही वाद नव्हता. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी पक्षात फूट पडली असल्याचा प्रचार करण्यात आला. आजही लोकसभा आणि राज्यसभेत आमच्याकडे बहुमत आहे. जर अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड करायची होती, तर पक्षाच्या घटनेनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. तथापि, तसे झालेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाचा दावा फेटाळून लावला जावा, असे प्रतिपादन कामत यांनी केले.
अचानक दावा केला जाऊ शकत नाही
पक्षातून बाजूला होऊन अचानक संपूर्ण पक्षावर दावा केला जाऊ शकत नाही. याबाबत निवडणूक आयोगाला घटनेतील काही कलमांचे तसेच प्रकरणांचे दाखले देण्यात आले असल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. अजित पवार गटाकडून खोटी माहिती पसरवली जात असून खोटा प्रचार केला जात आहे. त्याला उघडे पाडले जाईल, असेही अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.