शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला कथित वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात आला होता. तसेच या प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित सोशल मीडिया खाते हाताळणाऱ्या एका व्यक्तीसह आठ जणांना अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान आता याप्रकरणी आरोपींवर लवकरच दोषारोपत्र दाखल करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
त्या वादग्रस्त व्हिडिओमध्ये अश्लील ऑडिओ ट्रॅक जोडणे आणि तो व्हिडीओ सोशल मीडिया हँडलवर हा शेअर करणे या आरोपांचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र पोलिसांनी त्यांना या घटनेचा मूळ व्हिडिओ सापडू शकला नसल्याचे म्हटले आहे. मुळ व्हिडिओ न सापडल्याने व्हिडीओ मॉर्फ केला होता की नाही यावर ते भाष्य करू शकत नाहीत असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या वादात सापडलेल्या व्हिडिओमध्ये, शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या रॅलीत महिला माजी नगरसेवक एका आमदाराच्या गालावर चुंबन घेत असताना दाखवण्यात आले होते. हा कथितरित्या मॉर्फ केलेला व्हिडीओ शेअर झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील पाहायला मिळाल्या होत्या.
उद्धव ठाकरेंचा वेगळाच दावा...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र मूळ व्हिडीओ उपलब्ध असून पोलिस त्याचा तपास करण्यात रस दाखवत नाहीत. कारण या व्हिडिओमध्ये छेडछाड झालेली नाही हे त्यातून दिसून येईल असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील आरोपपत्र तयार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा ते तपासत आहोत. त्यामुळे आताया प्रकरणातील आरोपपत्र लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.
एका आयपीएस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, व्हिडीओमध्ये ऑडिओ ट्रॅक जोडला गेल्याची पुष्टी करण्यासाठी तो व्हिडिओ कलिना येथील राज्य फॉरेंसिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. तसेच ते व्हिडिओ फुटेज मॉर्फ करण्यात आलं होतं का? याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, आम्हाला घटनेचा मूळ व्हिडिओ मिळू शकला नाही आणि म्हणून आम्ही त्यावर भाष्य करू शकत नाही. मात्र, व्हिडिओमध्ये जोडल्या गेलेल्या अश्लील ऑडिओ ट्रॅकची पुष्टी झाली आहे आणि आम्ही त्यानुसार गुन्हेगारांवर आरोप निश्चित करणार आहोत.
या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
राज्य विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती, परंतु अखेरीस स्थानिक दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकराच्यातपासादरम्यान पोलिसांनी आठ जणांना अटक केली. तसेच या आठही आरोपींची अखेर जामिनावर सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना मार्चच्या पहिल्या आठवड्यात घडली होती जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला होता. नंतर, माजी नगरसेवकाच्या विधानाच्या आधारे, दहिसर पोलिसांनी कलम 354, 509, 500 तसेच 34 आणि कलम 67 अंतर्गत एफआयआर नोंदविला होता .
एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच, पोलिसांनी 12 मार्च रोजी दोघांना अटक केली. नंतर पोलिसांनी ठाकरे गटाशी संबंधीत फेसबुक खाते हाताळणारे विनायक डावरे यांना अटक केली. त्या हँडलवरून देखील हा कथित व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांनाही अटक केली होती. असे मॉर्फ केलेले व्हिडिओ ऑनलाइन शेअर करून महिलेची प्रतिमा खराब केल्याचा आरोप ठाकरे गटातील लोकांवर करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.