"हा निर्णय घटनेला अनुसरुनच झाला, पण भारतीय घटनेच्या नव्हे तर भाजपाच्या घटनेला अनुसरुन" अशा आशयाची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत या निकालावर टीका केली.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही चोरांच्या हातात देण्याचा अधिकार नार्वेकरांना कुणी दिला? आज जल्लोष करणाऱ्या लोकांच्या म्होरक्यांची अवस्था मुसोलिनीप्रमाणे होईल. नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहेत, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी या निकालावर टीका केली आहे. याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी निकालाची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांमध्येच नितेश राणे यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या फोटोसह एक शेर देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंना नाव न घेता हा टोला दिल्याचं म्हटलं जात आहे.
ठाकरे गटाचे १४ आमदार देखील पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. यामुळे या प्रकरणातील शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून सर्व ४० आमदार पात्र ठरले आहेत. एकमेकांना अपात्र करण्याच्या दोन्ही गटांच्या याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी आता ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन सुरू केलं आहे.
शिवसेना ही शिंंदेंचीच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. सोबतच शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण यापुढे कायदेशीर लढाई लढणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. या निकालाविरोधात आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.
तिसऱ्या गटातील केवळ ठळक मुद्दे मांडून, विधानसभा अध्यक्षांनी चौथ्या गटातील निकालाचे वाचन सुरू केलं आहे. ठाकरे गटाच्या आमदारांबाबत सहाव्या ग्रुपमध्ये निर्णय घेतला जाईल.
सहापैकी तिसऱ्या गटातील निकालाचे वाचन सुरू झाले आहे. यातील केवळ ठळक मुद्दे अध्यक्ष वाचून दाखवणार आहेत.
नार्वेकर म्हणाले, सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही. केवळ संपर्काच्या बाहेर गेले या कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. यामुळेच शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदार पात्र ठरले आहेत.
मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे गोगावलेंचा व्हिप योग्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाच्या २५ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीबाबत संभ्रम आहे. प्रतिनिधी सभेच्या पत्रावर केवळ दोघांच्या सह्या आहेत. प्रतिनिधी सभा झाली की नाही याबाबत साशंकता आहे, असं अध्यक्ष म्हणाले.
शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षाच्या कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम असल्याचं म्हणत, पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असल्याचा दावा राहुल नार्वेकरांनी फेटाळला आहे. यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख हे कुणालाही पदावरुन काढू शकत नाहीत, असंही अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. यामुळेच एकनाथ शिंदेंची हकालपट्टी अमान्य असल्याचं ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख हे २०१८ साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये १९ पैकी १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते, तर ५ हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत; असं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं आहे.
शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण केवळ याबाबत मी माहिती देणार आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. यासाठी 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरण्यात येणार आहे. केवळ सेनेच्या घटनेतील तरतुदींनुसार पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यात येणार आहे.
2018 साली ठाकरे गटाने केलेली दुरुस्ती ही चुकीची असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं आहे. यावर्षी अंतर्गत निवडणूक झाली नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय दिला. यासोबतच, उलटतपासणीला न आल्यामुळे ठाकरे गटाचं प्रमाणपत्र देखील अमान्य असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं.
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. यावर देखील तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 सालच्या घटनेची प्रत होती. त्यामुळे 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आले नाहीत.
विधानसभा अध्यक्ष सध्या खरी शिवसेना कोणती याबाबत निकालाचे वाचन करत आहेत. पक्ष ठरवताना पक्षाची घटना, विधिमंडळातील बहुमत, नेतृत्त्व हे घटक महत्त्वाचे असल्याचं ते म्हणाले. यासाठी निवडणूक आयोगाचा निकालही विचारात घेतला गेला आहे. यासाठी शिवसेनेची 2018 सालची घटना विचारात घेण्याची मागणी केली जात होती.
विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालय आणि दोन्ही गटाच्या आमदारांचे आभार मानून निकाल वाचनाला सुरुवात केली. निकालाची प्रत ही प्रत्येकाला मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
या निकालामध्ये ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा या याचिकेत आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या वाचनाला सुरुवात केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहेत. काही क्षणांमध्ये ते निकालाच्या वाचनाला सुरुवात करतील.
निकाल वाचनाची वेळ साडेचार असूनही अद्याप विधानसभा अध्यक्ष आपल्या कक्षात आहेत. निकाल वाचनाला ते मुद्दाम उशीर करत असल्याची चर्चा दिल्लीमध्ये सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जर निकाल वाचन पाच वाजण्याच्या आत पूर्ण झालं, आणि कॉपी दोन्ही गटांना दिली; तर सुप्रीम कोर्टात ई-मेल करून स्थगितीसाठी याचिका दखल केली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाची रजिस्ट्री 5 वाजता बंद होते. त्यामुळं आज याचिका दाखल होऊ नये, म्हणूनच उशीर करण्याची रणनीती असू शकते अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्या दालनात वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करत आहेत. निकाल जाहीर करताना त्रुटी राहू नये यासाठी ही चर्चा सुरू आहे.
दोन्ही गटांचे वकील आणि आमदार सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मात्र अजूनही अँटी चेंबरमध्ये आहेत. थोड्याच वेळात ते बाहेर येऊन निकालाचं वाचन सुरू करतील.
आमदार भरत गोगावले हे विधानभवनात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जय श्रीराम असा नारा दिला आहे. काही वेळातच निकालाचे वाचन सुरू होणार आहे.
निकाल जर शिंदेंच्या बाजूने आला तर ऋतुजा लटके आणि आदित्य ठाकरे यांना व्हीप बजावणार नाही, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.
शिंदे आणि ठाकरे गटांचे वकील विधानभवनात दाखल झाले आहेत. सायंकाळी साडेचार वाजता निकालाचं वाचन सुरू होणार आहे.
निकालपत्रावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन करतील.
आम्ही घेतलेला निर्णय हा कायदेशीरच आहे. आम्ही वेगळा गट स्थापन केलेला नसून, आम्हीच शिवसेना आहोत; असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.
आमदार अपात्रता निकालाला अवघा अर्धा तास शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आमदार अपात्रता निकालावरून प्रतिक्रिया येत असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी देखील निकालावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. निकाल काहीही आला तरी आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, असं ते म्हणाले.
शिंदे गटाचं पक्ष कार्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये निकालाचं वाचन सुरू होणार आहे.
आज लागणारा आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. निकाल वाचनाला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना ही अपडेट आली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दगडूशेठ गणपतीचरणी डोकं टेकवलं. यावेळी ठाकरे गटाचे इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अंधारे यांच्या हस्ते याठिकाणी आरती पार पडली. आमदार अपात्रतेप्रकरणी निकालासाठी आता अवघा एक तास बाकी आहे.
आजचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आम्ही कायदेशीररित्या बरोबर आहोत, आणि हेच आज सिद्ध होणार आहे; असं मत शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल हा सहा गटांमध्ये विभागलेला आहे. यातील प्रत्येक गटामध्ये 200 पानं आहेत. म्हणजेच, हा निकाल एकूण 1200 पानांचा आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यातील ठळक मुद्दे वाचून दाखवतील.
आजचा निकाल हा आमच्या विरोधातच लागणार असल्याचं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. दोन दिवसांपूर्वीच ही गोष्ट ठरली आहे, त्यामुळे आता आम्हाला निकालाबाबत उत्सुकता नाही, असंही ते म्हणाले.
एकीकडे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यवतमाळ दौऱ्यावर आहेत. ते याठिकाणी शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचे वाचन सायंकाळी साडे चार वाजता सुरू होणार आहे. सुमारे एक ते दीड तास हे वाचन सुरू राहील. यातील महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला वाचले जातील.
आज कुणाच्याही विरोधात निकाल न लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात फैसला करावा, असा निर्णय अध्यक्ष देऊ शकतात. तर एकनाख शिंदे यांना विधीमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळण्याती शक्यता आहे. सामच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला साडेचार वाजता सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एक ते दीड तास निकालाचे वाचन करणार आहेत. निकालातील ठळक मुद्दे आधी वाचले जाणार आहेत.
कायद्याचं रक्षण करुनच आजचा निकाल येईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे योग्य तोच निकाल ते देतील, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
अपात्रतेचा निकाल काय लागतो, यासंबंधी आम्हांला अजिबात कुतूहल नाही. कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा राहुल नार्वेकर यांनी टोलवाटोलवी केली. हा निकाल बाकीच्या सगळ्या निकालानंतर बेंचमार्क ठरेल, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
आजच्या निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची भेट झाल्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. याबाबत आता शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. "राहुल नार्वेकर हे आपल्या मतदारसंघातील कोस्टल हायवेचं काम आणि इतर प्रश्नांसाठी आले होते. अधिकाऱ्यांसोबत आमची ऑफिशिअल बैठक झाली. लपून-छपून बैठक झालेली नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
अवघ्या काही तासांमध्ये आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. खासदार संजय राऊत हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना ई-मेल पाठवले आहेत. आजच्या निकालासाठी उपस्थित राहण्याचे आदेश या ई-मेलमध्ये देण्यात आले आहेत.
आजच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण म्हणाले की, आजच्या निकालातून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपला नेतृत्वबदल करायला संधी मिळेल. जर ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र ठरले तर त्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ.
राहुल नार्वेकर म्हणाले की, आजचा निकाल हा मुलभूत हक्कासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. यामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेतली आहे. निकालामध्ये कायद्याच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येणार आहे. आजपर्यंत काही प्रोव्हिजनचं इंटरपिटीशन झालेलं नाही. अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. त्यामुळे या प्रोव्हिजन्सचा वापर केला जणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा लाईव्ह पाहता येणार आहे. या निकालाच्या वाचनाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरेंचे दोन खंदे शिलेदार हे आजच्या निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत. अनिल देसाई हे कोल्हापुरात आहेत; तर अनिल परब मुंबईबाहेर असणार आहेत. सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई, निवडणूक आयोगातील लढाई आणि विधान भवनातील अध्यक्षांच्या समोरील सुनावणी या सगळ्या लढाईत या दोन्ही नेत्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती.
विधिमंडळातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत अध्यक्षांची बैठक सुरू झाली आहे. राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रेचा निकाल संध्याकाळी देणार आहेत. त्याआधी एकूण नियोजनाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता. १०) संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी चार वाजता करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. (Maharashtra Politics)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.