सातारा : महामार्गावरील खड्डे बुजविणे आणि खराब रस्त्यांचे कार्पेटिंग करण्यासाठी रिलायन्स कंपनीला 15 दिवसांची मुदत देऊनही त्यांच्याकडून कामाकडे दुर्लक्ष झाल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समर्थकांसह शांततेच्या मार्गाने आज (बुधवार) आनेवाडी (जि. सातारा) टाेलनाका बंद पाडला.
हे घडले मंगळवारच्या बैठकीत...
आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी इशारा देताच मंगळवारी (ता. 17) जिल्हाधिकारी कार्यालयात रामचंद्र शिंदे, तेजस्वी सातपुते, महामार्ग प्राधिकरणाचे पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत पोतदार, रिलायन्स कंपनीचे टी. एन. सिंग, अनुपम खरे, एम. पी. चौधरी, "पीएस' टोलचे ए. त्रिपाठी, अमित भाटिया, संकेत गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे देविदास ताम्हाणे, तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे समर्थक आणि टोलविरोधी कृती समितीचे सदस्यांची बैठक झाली.
अवश्य वाचा - रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडे ६६ कोटींची थकबाकी
या बैठकीत रिलायन्स आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्यास आणखी दोन दिवसांची मुदत मागितली. महामार्गावरील रस्त्याचे कार्पेटिंग करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. त्यावरून अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना शब्दांनी अक्षरशः झोडपले. मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी देऊनही कामे झालेली नाहीत. त्यामुळे आता कामे होत नाहीत, तोपर्यंत टोल बंद ठेवा, असा सज्जड दम श्री. शिंदे यांनी भरला.
जरुर वाचा - खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव
तेजस्वी सातपुते यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असेल, असे सुनावले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत रिलायन्सचे टी. एन. सिंग यांनी मुदतवाढ द्या; पण टोल बंद करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे सांगत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देणेही टाळले. त्यामुळे उपस्थित टोलनाका विरोधी कृती समिती आणि शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनीही त्यांना धारेवर धरले. प्रत्येक वेळी बैठकीस नवीन अधिकारी येतो. मागच्या बैठकीत आश्वासन देणारे अधिकारी दिसत नाहीत, यावरूनही अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेले.
खड्डे भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्या, तसेच महामार्गाच्या कार्पेटिंगच्या कामासाठी 15 दिवसांची मुदत देण्याची मागणी श्री. सिंग यांनी केली; पण हे लेखी देतानाच या कालावधीत टोल बंद करा, असे सातपुतेंनी सांगितले; पण रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला. तुम्ही दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे तुम्हीच निर्णय घ्या. पोलिसांकडे मदत मागू नका, असा सज्जड दम सातपुतेंनी भरला, तरीही रिलायन्स व एनएचआयचे अधिकारी शांत राहिले.
अखेर "एनएचआय'चे श्रीकांत पोतदार यांनी चिटणीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यानंतर रामचंद्र शिंदेही त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलले व त्यांनी काम होईपर्यंत टोल वसुली बंद ठेवा, असे सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे समर्थक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, अमोल मोहिते, राजू भोसले, अशुतोष चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले; पण एवढी चर्चा होऊनही टोल बंद करण्यास श्री. सिंग यांनी नकार दिल्याने शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी टोल बंद आंदोलन करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
तीन शिफ्टमध्ये टोल बंद आंदोलन सुरु
एनएचआय आणि रिलायन्सने टोल वसुली बंद करण्यास नकार दिल्याने आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी शांततेच्या मार्गाने आनेवाडी टोल नाका बंद पाडला.
परिणमी सर्व वाहनांना विना टाेल देता जाता येणे शक्य झाले. या आंदाेलनातील सर्व कार्यकर्ते तीन शिफ्टमध्ये टोल बंदचे काम करतील. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी समजत नसेल, तर आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशाराही आंदाेलकांनी यावेळी दिला.
आनेवाडीत रोज 30 लाखांची टोल वसुली
रिलायन्सने महामार्गाच्या सहापदारीकरणासाठी दोन हजार कोटींचे काम घेतले आहे. हे काम टोलच्या भरवशावरच घेतल्याचे रिलासन्सचे अधिकारी टी. एन. सिंग यांनी सांगत दिवसाकाठी आनेवाडी टोलनाक्यावर 30 लाखांची टोलवसुली होत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.