मुंबई : ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार 'सामना' च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं घेतलाय.
शिवसेनेनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत केंद्र सरकारवही टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेचा सामनातून घणाघात
''भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाही..प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाही. राजकारणाचा हा नवा पदर बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावात्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून दम मारो दम करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते''
भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल,
“सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपाचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा. ‘‘एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात’’ असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजपा पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळय़ाचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल,” असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.
“उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही,” असा टोला शिवसेनेने पहाटेच्या वेळी फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने घेतलेल्या शपथेचा संदर्भात देत लगावला आहे.
“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे. ‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. केंद्रातील भाजपा धुरिणांना ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत, पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची चांगली परंपरा आहे. भाई श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, खडसे, शरद पवारसुद्धा विरोधी पक्षनेते होते. फक्त बेछूट आणि बेफाम आरोप करायचे व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते. सरकारचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे. सरकारच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात नाही. सरकार कधी गेले हे कळणारही नाही असे फडणवीस म्हणतात. हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.