नांदगाव (जि.नाशिक) : शिवसेनेच्या (shivsena) पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळही (chhagan bhujbal) मंत्री म्हणून दिसले नसते. नाशिकला तुमच्याकडे लाल दिवा आहे व तसा तो कधीतरी आमदार सुहास कांदे यांच्यानिमित्ताने नांदगावलाही येऊ द्यावा. कुठल्याही परिस्थितीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध सत्ता केंद्रांवरील शिवसेनेचा फडकणारा भगवा ध्वज खाली उतरवू देणार नाही. शिवाय आता भुजबळांनी नांदगावचा नाद सोडून द्यावा, अशा शब्दात आमदार कांदे व पालकमंत्री भुजबळ विवादावर भाष्य करीत शिवसेना कांदे यांच्या पाठीशी भक्कपणाने उभी असल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले. नांदगाव येथे रविवारी (ता. २४) झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
एकदा भुजबळांनाही बोलावून घ्यावे. त्यांचा छानसा पाहुणचार करावा,
खासदार राऊत यांच्या आगमनानंतर मेळाव्यात ते काय बोलणार, याची उत्सुकता अनेकांना होती. आमदार कांदे यांनी विविध विषयांची भूमिका मांडताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निधीवाटपात केलेल्या असमान वितरणाचा मुद्दा मेळाव्यात उपस्थित केला. त्याच सूत्रावर आधारित खासदार संजय राऊत यांनी चौफेर बॅटिंग केली. छगन भुजबळ महाआघाडीचे नेते आहेत. त्यांनी आमदार कांदे यांना समजावून घ्यायला हवे. कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासामागची तळमळ समजवून घेणे गरजेचे आहे, असे सांगताना आमदार कांदे चांगला पाहुणचार करतात. त्यांनी एकदा भुजबळांनाही बोलावून घ्यावे. त्यांचा छानसा पाहुणचार करावा, अशा शब्दांत राऊत यांनी भाषणाचा प्रारंभ केला. भेदाभेद करू नये, निधीचे सामान वाटप करावे, असा सल्लाही त्यांनी भुजबळांना दिला.
सन्मान टिकविण्याची जबाबदारी भुजबळांचीच
छगन भुजबळ महाआघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही त्यांचा सन्मान राखतो, असे सुरवातीलाच स्पष्ट करीत खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासासाठी प्रामाणिक तळमळ आहे, हे लक्षात घेऊन भुजबळांनी भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर विकासाची तळमळ राखणारा हा पहिला आमदार आमच्या शिवसेनेचा असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवसेनेच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात टिकून आहात. आज महाविकास आघाडीच्या सरकारात छगन भुजबळ नेते आहेत. त्यांचा सन्मानही आम्ही करू. मात्र, हा सन्मान टिकविण्याची जबाबदारीदेखील तुमची आहे, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
पाण्यात टाकलेले देवही आता कंटाळलेत,
उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्याला बसली आहे. त्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचा शब्द खासदार संजय राऊत यांनी आमदार कांदे यांना दिला. पालकमंत्री छगन भुजबळांनी नांदगावच्या पाहणी दौऱ्यात भाजपच्या माजी आमदाराला सोबत घेतल्याचा धागा पकडत राऊत यांनी भाजपच्या गाडीतील पेट्रोल संपले असून, सरकार पडावे म्हणून त्यांनी पाण्यात टाकलेले देवही आता कंटाळलेत, असा उपहास करीत जोरदार टीका केली.
शिवसैनिकांनी यापुढे शंभर आमदार निवडून आणण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सुनील बागूल, विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक, सभापती सुभाष कुटे, तेज कवडे होते. या वेळी महावीर पारख, गणेश धात्रक, किरण देवरे, संतोष बळीद, डॉ. संजय सांगळे, सुनील जाधव, राजेंद्र देशमुख, रमेश बोरसे, विष्णू निकम, अंजूम कांदे, नांदगाव तालुका महिला अध्यक्षा रोहिणी मोरे, प्रा. जितेंद्र शेवाळे, अंकुश कातकाडे, दिंडोरी लोकसभा समन्वयक अश्विनी चव्हाण, विद्युलता जगताप, संगीता बागल, राजेंद्र भाबड, मधुकर हिरे, अल्ताफ खान, आनंद कासलीवाल, महेंद्र दुकळे उपस्थित होते. माजी सभापती विलासराव आहेर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.