महाराष्ट्र बातम्या

गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, शिवसेनेनं सोडला टीकेचा बाण

नामदेव कुंभार

भुपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. निवडणुका जवळ आल्यानंतर अचानक मुख्यमंत्री बदल करण्यचाची भाजपची ही काही पहिलीच वेळ नाही. पण विकासाचं मॉडेल म्हणून देशभरात चर्चेत असणाऱ्या गुजरातमध्ये तसा बदल झालेला पाहून विरोधकांनी आता टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनही यावरुनच भाजपला धारेवर धरले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? याच पद्धतीने उत्तराखंड, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. मध्य प्रदेशातही बदल केले जातील असे संकेत आहेत. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, तेथेही नेतृत्वबदल होतील असे प्रसिद्ध झाले आहे. कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असा टीकेचा बाण शिवसेनेने सोडला आहे.

‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ -

भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळय़ांनाच पडला. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे.

भाजपचं धक्कातंत्र -

शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण धक्के देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. पक्षनेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल.

गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक

मावळते मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या काळात गुजरातमध्ये भाजप रसातळाला जात होती. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या तोंडास फेस आणला होता. आताही कोविड-कोरोना काळात सरकारी यंत्रणा साफ कोलमडली, गावागावांत मृतांच्या चिता पेटत राहिल्या, सरकार हतबल व हताश होऊन मृत्यूचे तांडव पाहत होते हा संताप लोकांत होता व आहेच. गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाडय़ा बनवणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला व 40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रूपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे. भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT