श्री गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेते संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढ आहे. विदर्भात विदेही संतांची मोठी परंपरा आहे. साईबाबा, ताजुद्दीन बाबा आणि गजानन महाराज हे समकालीन संत. ज्यांना देहाचे भान नव्हते; पण त्यांची प्रत्येक कृती मानव कल्याणाची होती. विदेही स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करणाऱ्यांची त्यांची विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात. भक्तावर असीम कृपेचे छत्र करत असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करायचे.
गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महानयोगी, भक्तवत्सल होते. त्यांना दांभिकता कर्मकाडांची चीड होती. भक्तसेवा हीच ईश्वरसेवा हा त्यांचा ध्यास होता. याचेच अनुकरण करीत गजानन महाराज संस्थान विविध सेवाभावी प्रकल्प राबवीत आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकट समयी लाखो भक्तांपर्यंत अन्नदानाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे, हेच त्यांचे सेवेचे प्रतीक आहे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले. तेव्हा महाराजांनी त्याला काठीने बदडून काढले याचाच अर्थ असा की, देवत्वाच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीला गजानन महाराजांचा विरोध होता. संत तुकोबांच्या ‘देव आहे अंतर्यामी’ या उक्तीनुसार प्रत्येकाच्या हृदयात वास करणाऱ्या देवत्वाचा सन्मान करा, असा संदेशच महाराजांचा होता.
माघ वद्य सप्तमी शके १८०८ म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराज शेगाव येथे देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळीवरील अन्न शोधून खात होते. अंगावर एक मळके कापड, पाणी प्यायचे एक भोपळ्याचे पात्र अशा अवस्थेतील विदेही तरुण बंकटलाल अग्रवाल यांच्या दृष्टीस पडले. बंटलालाने या अवलियासाठी पातुरकरांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली. पण सर्व जेवणाचे कालवण करून चव न घेता त्यांनी स्वीकार केला. तोच दामोदरपंत पाण्याचा तांब्या भरून येईपर्यंत त्या अवलियांनी जवळच असलेल्या गुरांचे पाणी पीत जेवण संपवले. दामोदरपंत म्हणाले, मी आपल्यासाठी निर्मळ गार पाणी आणले आहे. त्यावर महाराज म्हणाले,
हे अवघे चराचर, ब्रह्मे व्याज साचार
जेसे गढूळ, निर्मळ वासीत नीर, हे न भेद राहिले
याचा अर्थ असा की, पूर्ण चराचरामध्ये भगवंत वास करतो, मग गढूळ आणि निर्मळ पाण्यात काय फरक करावा. महाराजांच्या जीवनकार्याचा हाच संदेश आहे.
एक प्रसंगात गोविंदबुवांचे कीर्तन यात महाराज बसले होते. बुवांनी एकदा स्कंधाचा श्लोक म्हणत असतानाच त्या श्लोकाला महाराजांनी गोविंद बुवापेक्षा लवकर बोलून समाज केला. हे ऐकून गोविंद बुवा आर्श्चयकीत होऊन गावकऱ्यांना म्हणतात. कोणीतरी महापुरुष आहेत. महाराजांजवळ जाऊन आपण साक्षात शंकराचे रूप, आपण बाहेर न बसता मंदिराच्या आतमध्ये चालावे त्यावर महाराज म्हणतात, गोविंदा तुझ्या शब्दामध्ये एकवाक्यता ठेव. आता तूर कीर्तनामध्ये सांगत होता. ईश्वराने ही पूर्ण धरती व्यापली आहे. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे. मग आता का म्हणतोस की मंदिराच्या आत चला, साधकाने जसे बोलावे तसे वागावे तू जा आणि कीर्तन पूर्ण कर आम्ही ऐकतो येथूनच असे सांगत महाराजांनी गोविंदबुवांना कीर्तनाला पाठविले.
महाराजांनी परमार्थात खोटेपणा, दांभिकता याला अजिबात थारा दिला नाही. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हेच ईश्वरी तत्त्व मानले. भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांची एक स्वतःची विशिष्ट शैली होती. यासंदर्भ दासगणू महाराज म्हणतात.
मना समजे नित्य, जीव हा ब्रम्हास सत्य
मानू नको त्याप्रत, निराळा त्या तोची असे
या मंत्राचा अर्थ असा की जीव ज्ञानी ब्रम्ह एकच आहे. त्यांना निराळे समजू नका-समानता हेच सूत्र महाराजांचे होते. म्हणूनच मातंगपुऱ्यात महाराज राहिले. त्यांची दुःखे दूर केली. अस्पृश्यता मानली नाही. माणूस हे तत्त्व मानून सेवा हे परमोधर्म मानला. म्हणूनच गजानन महाराज संस्थान सेवा हेच उद्दिष्ट मानून सेवाप्रकल्पातून सामाजिक सेनेचे मोठे कर्माचे जाळे उभे केले.
सर्व धर्म समभाव हा दृष्टिकोन समोर ठेवून रचनात्मक कार्याला प्रगतिपथावर नेऊन शिवभावे जीवनसेवा हे ब्रीद अंगभूत मानले. आदिवासी भागातील संस्थानचे कार्य, दृष्टीहितांना दृष्टी, दिव्यांगाचे मदत, अन्नदान, औषधोपचार विविध सामाजिकांना आर्थिक मदत अशा स्वरूपाचे ४२ सेवा पकल्प मंदिर राबवीत आहे. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत पाच लाख गरजूंपर्यंत कम्यूनिटी किचनच्या माध्यमातून अन्नदान आणि शेगाव येथे पाचशे बेडचे कोविड हाॅस्पीटल उभे केले. या पाठीमागे महाराजांची शिकवण आहे.
गजानन महाराज हे विदेही संत होते. त्यांना संपूर्ण ब्रम्हज्ञान प्राप्त झालेले होते. जीवा-शिवाचे मीलन होते. अशा जीवनमूल्यांना देहाचे भान राहत नाही. असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते. म्हणूनच बहुधा दिगंबर अवस्थांतच असत. दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले,
तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी
नसत्या गोष्टीशी, महत्त्व न यावे निरर्थक
श्री गजानन महाराज एक परमहंस संन्यासी होते. धर्मशास्त्रामध्ये कुटीकच, बहूदंक हंस आणि परमहंस असे संन्यासाचे चार प्रकार सांगितलेले आहेत. शिखा व यज्ञोपवीत ठेवून भगवीवस्त्रे धारण करून घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून, बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो कुटीकच संन्यासी होय.
संत हे हरीच्या गळ्याचे ताईत, संत हे साक्षात कल्पतरू
या उक्तीचे प्रत्यंतर संत विचारसाधनेत आल्यावरच कळून येते. संत गजानन महाराज हे सद्गुणांचे माहेरघर आहे. जीवन कल्याणाचा मर्ग त्यांच्या अंगीभूत शलाकेतून स्पष्ट होते. विश्वप्रभू आणि महाराज एकच आहेत. योगी योगेश्वर याची एक जाणा, शेगावीचा राणा, श्री गजानन सिध्दावस्थेला पोहोचलेले श्री गजानन महाराजांना उपमा ईश्वराचीच द्यावी लागेल.
तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर
तू भक्तासी साचार, कल्पतरु वा चिंतामणी
अवतारलासी भूवर, जडमूढ ताराया हे कार्य महाराजांनी सदोदित केले. मौलिक अशा तत्त्वज्ञानाची बैठक त्यांच्या आचारधर्माला हेाती. जनसेवा हे लोककल्याणाचे साधन असते. या सात्त्विक सिद्धांताचे प्रात्यक्षिक असे मूर्त स्वरूप म्हणजे या योगी योगेश्वराची जीवन शलाका होय. महाराजांच्या चरित्र चंदनाच्या जीवनोदेशाचा परिमल सर्वांसाठी वितरित करण्याचे कार्य तेव्हापासून महाराजांच्या भक्तगणांनी एकनिष्ठपणे सुरू ठेवले आहे. सर्वांठायी भगवंत हाच खरा पुरुषार्थ आहे. हाच गजानन महाराजांनी दिलेला संदेश आहे. वर्तमान स्थितीत देवत्वाच्या नावाखाली जो बाजार मांडला आहे. त्याला हे खरे उत्तर आहे. जेथे स्वच्छ व्यवहारासोबत मन आणि परिसराची स्वच्छता असेल तेथे दैवत्व प्रगट होते. जेथे देवत्व तेथे समाजाच्या कल्याणाची, सुखाची पहाट निर्माण झाल्याशिवाय राहत नाही हा संत गजानन महाराजांच्या जीवनाचा मूलमंत्र आचरणात आणावा आणि समाजाच्या वैश्विक कल्याणाची संकल्पना अधोरेखित करावी असे मनस्वीपणे वाटते दासगणू महाराजांनी संत गजाननाच्या दर्शनाचा आध्यात्मिक आनंद पुढील रचनेतून व्यक्त केला आहे.
निर्गुण ब्रह्म सनातन, अव्यय अविनाशी
स्थिरचर व्यापून उरले, जे या जगतासी
ते तू तत्त्व खरोखर, निसंशय असशी
लीलामात्रे धरिले, मानव देहासी
- डॉ. प्रा. राजेश मिरगे, अमरावती
संवाद - 9404710558
dr.rajeshmirge1975@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.