सोलापूर : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. समांतर जलवाहिनीचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. तत्पूर्वी, प्रशासनाला सर्व अडथळे दूर करावे लागणार आहेत.
सोलापूर शहराला एक-दोन दिवसाआड किंवा नियमित पाणीपुरवठा करण्याचे महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोलापूर ते उजनी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. आतापर्यंत ८८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू आहे. पण, आता पावसामुळे चिखल झाल्याने काही ठिकाणी काम थांबले आहे. पावसामुळे कामाला अडथळा येऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी सुरवातीला काळी माती असलेल्या ठिकाणचे काम पूर्ण करीत आहेत. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण अपेक्षित असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी जॅकेवलचे काम पूर्ण केले जात आहे.
समांतर जलवाहिनीला ‘येथे’ अडथळा
उजनी ते आढेगाव (८०० मीटर) मार्गावरील शेतकऱ्यांनी जलवाहिनी थांबविली असून मोबदला अधिक मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
खंडाळी, हिवरे व पाकणी येथील (प्रत्येकी ४०० मीटर) वन विभागाच्या जागेतून जलवाहिनी जाणार असून त्याला अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाही.
देगावजवळील देशमुख वस्तीमागे ४०० मीटर काम थांबले असून तेथे शिवरस्त्यातून जलवाहिनी जाणार आहे, पण शेतकऱ्यांनी मोबदला मागितला आहे.
टेंभूर्णी बायपासजवळ १८०० मीटर काम अपूर्ण असून त्याठिकाणी महामार्गाची जागा नसल्याने मोबदला देऊन खासगी जागेतून जलवाहिनी न्यावी लागणार आहे.
सोरेगाव ते सोरेगाव पंपहाऊसपर्यंत काम लवकरच
समांतर जलवाहिनीचे २२ किलोमीटर काम अद्याप अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काळी माती असलेल्या ठिकाणचे काम प्राधान्याने केले जात आहे. सोरेगाव ते सोरेगाव पंपहाऊसपर्यंतच्या कामाला कोणताही अडथळा नाही. पाऊस पडला तरी या ठिकाणचे काम करता येणार असल्याने हे मागे ठेवण्यात आले आहे.
मुदतीत काम पूर्ण होईल
सध्या पावसाळा सुरू झाल्याने काळी माती असेल त्या ठिकाणच्या कामाला अडचणी येत आहेत, पण अशा ठिकाणचे काम प्राधान्याने केले जात आहे. इतर ठिकाणचे काम देखील महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली वेळेत पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यांनतर नोव्हेंबरमध्ये पाण्याचे ट्रायल होईल.
- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, महापालिका, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.