मुंबादेवी : एसटी कर्मचारी संघटना एसटीचा संप (ST Employee Strike) मागे घेत आहे, अशी भूमिका अजय गुजर (Ajay Gujar) यांनी जाहीर केली असली, तरी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांनी मात्र आपण विलीनीकरणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले असून, अजय गुजर यांनी आतापर्यंत साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
आपण यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना आझाद मैदानातून आझाद केले होते, तसेच आता आपण गुजर यांना आझाद करत आहोत, अशी भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली. आता आपला लढा हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली असाच सुरू ठेवू. शेवटी आपण ३०० रुपयांचे वकिलपत्र त्यांच्याकडे दिलेले आहे, म्हणजेच विलीनीकरणाच्या मागणीसाठी आपण त्यांना ठाम पाठिंबा दिल्याचे एसटी कर्मचारी म्हणाले. आपला लढा हा पूर्वीही संघटनाविरहित होता आणि आताही संघटनाविरहित आहे. यापुढेही संघटनाविरहीत राहील. जोपर्यंत अॅड. सदावर्ते आमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत माघार घेणार नाही, असेही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यावर म्हणाले की, २८ संघटनांनी आधीच माघार घेतली. आता २९ व्या संघटनेने माघार घेतली आहे. मी अजय गुजर यांना टाळ्या वाजवून सांगतो, आम्ही सगळे एकत्रित आहोत. हा दुखवटा मोडला जाऊ शकत नाही. हजारो कष्टकरी एकत्र आहेत. अॅड. सदावर्ते पुढे म्हणाले की, गुजर दुपारी जेवायला माझ्यासोबत होते. शरद पवार यांनी गुजर यांच्यावर दबाव टाकला. त्यांनी आता माघार घेतली. गुजर यांना टाळ्या वाजवून मुक्त करत आहोत. सेनेच्या मंत्र्यांची उद्या भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुजर अथवा परब कामगारांना न्याय देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवू, असेही ते या वेळी म्हणाले.
गुजर यांच्यावर राग
गुजर यांच्या निर्णयानंतर आझाद मैदानावर काही काळ वातावरण संतप्त होते. कामगार आंदोलक घोळक्यात चर्चा करत होते. त्याचा राग उघडपणे अजय गुजर यांच्यावर होता. या वेळी आंदोलक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची आझाद मैदानावर वाट पाहत असल्याचे दिसून आले. काही आंदोलक एक दुसऱ्याला संयम न सोडण्याचे सांगत धीर देत होते. आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आत जाणाऱ्या प्रत्येकाची ओळखपत्रे तपासून केवळ एसटी कर्मचाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.