गेली काही वर्षे प्रेक्षक संख्येचा दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत यंदाचे वर्ष मात्र अपवाद ठरताना दिसते आहे.
पुणे - गेली काही वर्षे प्रेक्षक संख्येचा दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत यंदाचे वर्ष मात्र अपवाद ठरताना दिसते आहे. १५ नोव्हेंबरपासून भरत नाट्य मंदिर येथे सुरू झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. दररोज सरासरी साडेतीनशे ते चारशे प्रेक्षक स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहत असून स्पर्धेसाठी छपाई केलेली सर्व साडेतीन हजार तिकिटे आत्ताच संपली आहेत. या सुखद चित्रामुळे स्पर्धेत भाग घेतलेल्या कलाकारांच्या उत्साहातही वाढ झाली आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. अनेक दिग्गज कलाकार या स्पर्धेतून पुढे आले. गेली काही वर्षे मात्र स्पर्धेचा उत्साह कमी झाल्याचे तसेच प्रेक्षकांनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यातच कोरोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात खंड पडल्याने गतवर्षी सहभागी संघांची संख्याही रोडावली होती. यंदा मात्र सहभागी संघाच्या संख्येत एक तृतीयांश वाढ झाली. संघांच्या उत्साहाचे प्रतिबिंब प्रेक्षकांच्या संख्येतही पडले.
सर्व तिकिटांची विक्री
स्पर्धेचा तिकीट दर अवघा १५ रुपये व १० रुपये इतका अत्यल्प आहे, तर विद्यार्थ्यांना स्पर्धा पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे. याचा लाभ घेत मोठ्या संख्येने रसिक यंदा नाटक पाहण्यासाठी हजेरी लावत आहेत. दररोज ३५०, ४००, ४२० अशी प्रेक्षकसंख्या नाट्यगृहात पाहावयास मिळते आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन स्पर्धेसाठी सुमारे साडेतीन हजार तिकिटांची छपाई करण्यात आली होती; मात्र स्पर्धा सुरू झाल्यावर दहा दिवसांतच या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.
दरवर्षी साधारणपणे पूर्ण स्पर्धेसाठी तीन हजार तिकिटे छापावी लागतात, परंतु यावेळी आत्ताच तेवढी तिकिटे संपली आहेत. त्यामुळे पुन्हा तेवढी तिकिटे छापावी लागणार आहेत. दररोज सरासरी साडेतीनशे तिकिटांची विक्री होत आहे आणि सन्मानिका व संस्थेचे पास एकत्र करून सुमारे ४०० पेक्षा अधिक प्रेक्षक नाटक बघत आहेत. हौशी नाट्य कलावंतांसाठी प्रेक्षागृह भरलेले असताना प्रयोग करण्यासारखा दुसरा आनंद नाही.
- राहुल लामखडे, समन्वयक, पुणे केंद्र
वीजबिलात दिलासा नाहीच!
भरत नाट्य मंदिरने यंदा वीजबिलात दुप्पट वाढ केली आहे. सरकारने समन्वयकाच्या स्वाक्षरीचे पत्र नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाला देऊनही ही वाढ कमी झाली नाही. सहभागी स्पर्धकांना याचा फटका बसत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्वाक्षरीचे पत्र भरत नाट्य मंदिरला देण्यात आले; मात्र ही विनंती पण भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाने अमान्य केली. परिणामी स्पर्धकांना दिलासा मिळालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.