पुणे : महाराष्ट्र शासनाने मेगाभरती होणार म्हणून मोठा गाजावाजा केला, जाहिराती काढून अर्ज मागविले. 'एमपीएससी'ची परीक्षाही झाली. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा'कडून निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे हजारो भावी अधिकारी निराश झाले आहेत. जुलै ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १ हजार ९२० पदांसाठी सहा परीक्षा झाल्या असून एकही निकाल लागलेला नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्य़ा परीक्षांच्या माध्यमातून नशीब आजमावण्यासाठी लाखो विद्यार्थी दिवस- रात्र एक करुन अभ्यास करतात. यात हजारात असणाऱ्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. या परीक्षेच्या अभ्यासात कोणती ही त्रुटी निर्माण होवू नये, यासाठी अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराचा रस्ता धरतात. ज्यांना शक्य आहे असे लोक मोठाली फी भरुन क्लासेस जॉईन करतात. तर ज्यांना शक्य नाही ते स्वबळावर अभ्यास करुन यश मिळवतात. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात चार ते पाच लाख विद्यार्थ्यांपैकी १ ते दीड लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. या विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करुन अभ्यास केला अन् परीक्षा दिली. तरी निकाल काय लवकर लागेना. त्यामुळे लाखो विद्यार्थी आता चिंतेत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी थोडक्यात...
१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्य कोणते?
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या परीक्षा कोणत्या?
- राज्यसेवा परीक्षा, पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक, टंकलेखक / लिपीक परीक्षा. राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.
३) अ संवर्गात भरण्यात येणारी पद कोणती?
- अ संवर्गात भरण्यात येणारी पद पुढीलप्रमाणे- उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी), सहायक पोलिस आयुक्त (एसीपी), सहजिल्हा उपनिबंधक, उप अभियंता, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, विक्री कर सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, मुख्य अधिकारी (नगरपालिका), गटविकास अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, सहाय्यक विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षक, व्याख्याता, भूमी अभिलेखांचे उपपरिरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक, तहसीलदार, नगररचनाकार
४) ब संवर्गात भरण्यात येणारी पद कोणती?
- तालुका कृषी अधिकारी, सर्कल अॅग्री ऑफिसर, जिल्हा शिक्षणाधिकारी, सीडीपीओ, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य अधिकारी, सहाय्यक अभियंता, आरएफओ, उद्योग अधिकारी सहाय्यक शहर नियोजक, पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहाय्यक डेस्क अधिकारी ही पदे ब संवर्गात भरण्यात येतात.
५) परीक्षेचे स्वरूप कसे असते?
- पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये परिक्षा होते. यामध्ये पूर्व परीक्षेसाठी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असते. तर मुख्य परीक्षेत ६ पेपर असतात. 'राज्य सेवा परीक्षा' मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असते.
६) परीक्षेसाठी आवश्यक असणारी पात्रता?
कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार 'राज्य सेवा परीक्षा' देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) आवश्यक असते.
पुणे - विद्यार्थ्यांची पहिली पसंती
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात अलीकडील काळात वाढली आहे. त्यातही राज्य सेवेची तयारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा ओढा पुणे शहराकडे जास्त आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध मार्गदर्शन वर्ग, अभ्यासिका, पुस्तके, अलीकडील काळात यशस्वीतांचा वाढलेला टक्का आणि ग्रुप स्टडी या कारणांमुळे पुण्यात परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यूपीएससीसाठी दिल्ली आणि एमपीएससीसाठी पुणे असं नवं समीकरण आता तयार झालं आहे.
स्पर्धा परीक्षेची बाजारपेठ
अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठा हे दोन महत्त्वाचे सिद्धांत आहेत. हेच सिद्धांत पुणे शहराला तंतोतंत लागू पडतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढली तशी क्लासेस, अभ्यासिका, खानावळी, होस्टेल आणि या परिसरातील चहा-नाष्टा, झेरॉक्स व्यावसायिकांची संख्याही वाढली. (किंवा या सर्व गोष्टींची उपलब्धता वाढली, म्हणून विद्यार्थ्यांची संख्या वाढली असंही म्हणता येईल. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पेठा या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यापून टाकल्या आहेत. (थोडक्यात त्या या विद्यार्थ्यांची वसाहत म्हणून उदयास येत आहेत.) आपल्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीचे होस्टेल, पी.जी. रुम्स आणि अभ्यासिका पुण्यात सहज उपलब्ध आहेत. आणि एका विद्यार्थ्यांला महिनाकाठी सरासरी सहा-सात हजार रुपये खर्च येत असल्यामुळे मुंबई आणि दिल्ली या शहरांपेक्षा विद्यार्थी पुण्यालाच पहिली पसंती देतात.
जीवघेणी स्पर्धा
एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. (फॉर्म भरणाऱ्यांची संख्या वेगळीच). साधारण एक ते दीड लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेला बसतात. तर देशभरातून चार-पाच लाख विद्यार्थी यूपीएससीमध्ये नशीब आजमावतात. एकट्या पुणे शहरातून एमपीएससीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजाराच्या घरात आहे.
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एमपीएससीचं वार्षिक वेळापत्रक जाहीर होतं. एप्रिल महिन्यात पूर्व परीक्षा (प्रीलिम्स), त्यानंतर तीन महिन्यांनी साधारण ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये मुख्य परीक्षा (मेन्स) आणि मग मुलाखत असा वर्षभर हा कार्यक्रम चालतो.
वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवारांचं काय होणार?
जे विद्यार्थी यावर्षी शेवटचा अटेम्प देणार होते, आणि ज्यांची वयोमर्यादा संपणार होती, त्यांच्या पोटात गोळा उभा राहिला आहे. कोरोना महामारीमुळे दोन्ही आयोगाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेवटची संधी म्हणून नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांच्या डोळ्यापुढे अंधार दाटला आहे. वय झालं तरी हातात नोकरी नाही, नोकरी नाही त्यामुळे छोकरी नाही. एमपीएससीची परीक्षा झाल्यावर लग्नाचा बार उडवू, या विचारात लग्न जमवणाऱ्यांच्या पुढे आता काय करायचं हा प्रश्न. हे झालं मुलांचं. मुलींना मात्र पर्याय नाही. लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसलेल्या अनेकजणींच्या घरची मंडळी त्यांची लग्न लावून देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरणार या विचाराने मुलीही कमालीच्या निराश झाल्या आहेत.
ज्यांची ही शेवटची संधी होती, त्यांना आयोग आणखी संधी देणार का? राज्य सरकार त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार? मिळाली संधी तर ठीक नाहीतर मग काय? अशा असंख्य प्रश्नांचा हल्लकल्लोळ विद्यार्थ्यांच्या मनात उडाला आहे. त्यामुळे हे सर्व उमेदवार राज्य सरकारच्या निर्णयाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
लॉकडाउनमुळे घरी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी
राज्यात लॉकडाउन जाहीर करण्याच्या एक दिवस अगोदर गावी गेलेला वैभव पुढे आता कसा अभ्यास करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. तो यूपीएससीची तयारी करतोय. लॉकडाउन साधारण एक महिनाभर राहिल, या अंदाजाने त्याने गावी जाताना मोजकीच पुस्तके सोबत नेली. मात्र, लॉकडाउन इतका वाढतच जाईल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सोबत नेलेली पुस्तके दोन-तीन वेळा वाचून झाली आहेत. गावाकडे मोबाईलला रेंज मिळता मिळत नाही, तिथं इंटरनेट कसं चालणार? टीव्हीवर वेगवेगळ्या बातम्या येत असल्याने आणखीच गोंधळ उडण्यापेक्षा त्यानं बातम्या पाहणंच सोडून दिलं आहे.
तिच परिस्थिती धनंजयची. तो पंढरपूरमध्ये राहत असल्याने त्याच्या घरी इंटरनेटचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे सध्या तो अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतोय. क्लासेस वाल्यांनी एमपीएससीचं स्टडी मटेरिअल ऑनलाइन उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे सध्या त्याचा अभ्यास बऱ्यापैकी चालू आहे. पण जी मजा पुस्तके वाचण्यात असते, ती मोबाईलवर आलेल्या पीडीएफ वाचण्यात येत नाही, असं तो म्हणतो. कारण पुस्तकाच महत्त्वाचे भाग हायलाईट करता येतात. आणि रिव्हिजनच्या वेळी त्याचा बराच फायदा होतो. पीडीएफ वाचण्यात अडचणीही येतात आणि बराच वेळही जातो. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करत ग्रुप डिस्कशन करतो, पण अभ्यासाव्यतिरिक्त एकमेकांच्या गावात, जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, हे विचारण्यात बराच वेळ जातो, असं धनंजय म्हणाला.
हे झालं पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, पण माझ्यासारखे अनेकजण नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. फार्मसी, मेडिकल किंवा इतर क्षेत्रात जॉब करत असलेल्या उमेदवारांना कंपन्यांनी थांबवून ठेवलंय. पण त्यांच्या जेवणाचे वांदे होत आहेत. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आपण ऑफिसचं काम करावं, घरचं (शेतीचं) काम करावं, की अभ्यास करावा याची जुळवाजुळव करण्यात दिवस निघून जात आहे.
विद्यार्थ्यांचं भविष्य लागलंय टांगणीला
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकार सरकारी नोकरीभरती रिक्त जागांपेक्षा कमीच जागा भरत आहे. (आणि आता कोरोनाच्या फटक्यामुळे पुढील नोकर भरतीच्या जाहिरातीत कमीच जागा काढल्या जातील, असा अंदाज बांधला जात आहे.) एमपीएससी वार्षिक वेळापत्रकाप्रमाणे ठरलेल्या तारखांनुसार जाहिरात काढते. पण, निघालेल्या जागांच्या भरतीमध्ये काही कारणांमुळे पुन्हा खोडा येतो.
भरती प्रक्रियेत हस्तक्षेप, परीक्षेदरम्यान विविध केंद्रांवर झालेले गैरप्रकार, डमी विद्यार्थी, त्याविरोधात कोर्टात दाखल केलेल्या केसेस, त्यानंतर कोर्टाची सुनावणी, प्रलंबित निकाल, त्यात महापोर्टलसारख्या अनेक अडचणी मधूनच डोके काढत असल्याने अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्येच विद्यार्थ्यांचा जास्त वेळ जातो. त्यात एखादी नैसर्गिक किंवा कोरोनासारखी मानवनिर्मित आपत्ती आली की दुष्काळात तेरावा. त्यामुळे भविष्याची चिंता वाहत वाट पाहण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांपुढे सध्या कोणताच पर्याय नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.