सोलापूर : यंदा इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीपेक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे. पण, पुणे बोर्डाने निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो. यासंदर्भात बोर्डाने निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असून तेथून परवानगी मिळाल्यावर काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, अन्यथा निवडणुकीनंतरच ते जाहीर केले जाईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, त्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा पार पडणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम केले आहे.
आता फक्त दहा दिवस अलीकडे होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आचारसंहितेत प्रसिद्ध करता येईल का, यावर मार्गदर्शन घेतले जात आहे. आचारसंहितेचा काही अडथळा नसल्यास काही दिवसांत ते जाहीर होईल. दुसरीकडे परीक्षा दहा दिवस अलीकडे घेतल्याचे राजकीय भांडवल होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. कारण, १० ते २० पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीतील निर्णय घेतल्यावर असाच प्रकार झाला होता. त्यामुळे बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले आहेत.
परीक्षेचे असे आहे वेळापत्रक
इयत्ता बारावी
प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी
लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च
------------------------------------------------------------
इयत्ता दहावी
प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च
परीक्षा १० दिवस अगोदर का?
परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल
परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो
पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.