सोमेश्वरनगर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगले दर असल्याने व रुपयाचे मूल्य घसरल्याने महाराष्ट्रातून निर्यातीला ३८५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळू लागला आहे. ऑक्टोबरमध्ये ५०० डॉलर प्रतिटनावर आलेले आंतरराष्ट्रीय दर आता ५२५ ते ५४० डॉलर प्रतिटनापर्यंत जात आहेत. कोटा पद्घतीने निर्यात करण्याचा केंद्र सरकारचा आदेश मिळण्याआधीच राज्यातील बहुतांश कारखान्यांनी निर्यात करार केले होते. मात्र आताच्या तेजीचा लाभ मिळावा म्हणून कारखाने कराराची फेररचना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
निर्यात कराराचा सपाटा
गेल्या वर्षी केंद्र सरकारने खुल्या साखर निर्यातीस परवानगी दिली होती. त्यामुळे देशातून ११२ लाख टन साखर निर्यात होऊ शकली. यावर्षीही निर्यात खुलीच राहील, असे कारखान्यांनी गृहित धरले होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच सुरवातीच्या खर्चासाठी व ‘एफआरपी’ची तजवीज करण्यासाठी निर्यात कराराचा सपाटा लावला.
आंतरराष्ट्रीय बाजार वधारले
ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ५०० डॉलर प्रतिटनाच्या आसपास दर होते. म्हणजेच देशांतर्गत बाजार तीन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असताना ३३०० ते ३५०० रुपये निर्यातदर मिळतो म्हणून करार केले. मात्र, केंद्र सरकारने खुल्याऐवजी कोटा पद्धतीने एकूण ६० लाख टन निर्यातीचा निर्णय घेत राज्यातील कारखानदारीला धक्का दिला.
देशातील प्रत्येक कारखान्यास तीन वर्षातील साखर उत्पादनाच्या सरासरीच्या १८.२३ टक्के साखर निर्यात करण्याचा कोटा ठरवून दिला. निर्यात करू शकणार नाहीत अशा उत्तर प्रदेशातील कारखान्यांनाही कोटा मिळाला. भारत साखरेची निर्यात फार करू शकणार नाही हे लक्षात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजार वधारले.
निर्यातकोटा खरेदीबाबत निर्णय नाही
उत्तर प्रदेशातून निर्यात होत नाही. महाराष्ट्रातील कारखाने उत्तर प्रदेशाचा कोटा विकत घेत नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनाही निर्यातीसाठीची महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागणार आहे. ‘यूपी’चा निर्यातकोटा खरेदी करायचा नाही या राज्यातील कारखान्यांच्या निर्णयासाठी एकीचा उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.
साखरेचे नोव्हेंबरमधील जागतिक दर (आंतरराष्ट्रीय साखर संघटनेनुसार)
(आकडेवारी डॉलर प्रतिटन)
१ नोव्हेंबर - ५१७.४५
७ नोव्हेंबर - ५२०.७५
१४ नोव्हेंबर - ५५३.५०
२१ नोव्हेंबर - ५३१.८५
२५ नोव्हेंबर - ५२५.६५
३० नोव्हेंबर - ५३२.८०
साखरेचे आधीचे करार ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचे आहेत. तेजीचा लाभ व्हावा म्हणून जुन्या करारात वाढ करावी अशी कारखाने निर्यातदारांना मागणी करत आहेत. तर नवे करार मात्र सरासरी ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलने होत आहेत. व्यापाऱ्यांची गरज, बंदराचे अंतर यानुसार दर कमीअधिक होत असतो.
-राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.