सोमेश्वरनगर - महाराष्ट्रात ३१ मार्चअखेर १४० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सध्या साखर हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. साखर आयुक्तालय, साखरउद्योग यांच्यासह सर्वांचेच साखरनिर्मितीचे अंदाज चुकले असून, आतापर्यंत तब्बल १०७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उताराही पाव टक्क्यांनी वाढल्याने साखरउद्योगाचा गोडवा वाढला आहे.
ऊस टंचाईमुळे २०२३-२४ हंगाम शंभर-सव्वाशे दिवसांत संपेल असे अंदाज फोल ठरले असून, अद्यापही ६७ कारखान्यांची धुराडी धडधडत आहेत. साखरआयुक्तालयाने ९२१ लाख टन ऊसगाळप होऊन ८८ लाख टन साखरनिर्मिती होईल आणि १५ लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविली जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. साखरउद्योग आणि बाजारपेठही यामुळे चिंतेत होती.
केंद्र सरकारनेही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून साखरेवर आणि इथेनॉलवर बंधने घातली. परंतु सगळ्यांचेच अंदाज मार्चअखेरच्या साखर आयुक्तालयाच्या गाळप अहवालाने फोल ठरवले आहेत.चालू हंगामात २०७ कारखान्यांनी १०४९ लाख टन उसाचे गाळप करत १०७ लाख ३१ हजार टन साखरनिर्मितीचा टप्पा गाठला आहे. केंद्राने इथेनॉलनिर्मितीची कोंडी केल्यामुळेही साखरनिर्मितीचा टक्का वाढला आहे.
कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगरमधील कारखाने सुरू
सोलापूर जिल्ह्यातील साखरहंगाम जवळपास संपला आहे आहे. कोल्हापूर, पुणे व अहिल्यानगर विभागात मात्र अजून कारखाने सुरू आहेत. सद्यःस्थितीत मागील हंगामात २०० कारखाने बंद झाले होऊन हंगाम संपला होता. चालू हंगाम १५ ते २० एप्रिलपर्यंत जाईल आणि अंदाजापेक्षा २२ ते २५ लाख टन जास्त साखरनिर्मिती होईल, असे स्पष्ट झाले आहे.
साखर उताऱ्यात दिलासादायक वाढ
देशात अतिरिक्त साखरनिर्मिती आणि निर्यातबंदी अशा कारणांनी साखरेचे भाव पडल्याने साखरउद्योग चिंतेत आहे. मात्र, मागील हंगामाच्या (९.९८ टक्के) तुलनेत चालू हंगामात (१०.२३ टक्के) ०.२५ टक्के साखर उतारा जास्त मिळाल्याने थोडा दिलासाही मिळाला आहे. त्यामुळे अधिकची साखरनिर्मिती होऊन काहीशी तूट भरून निघणार आहे. उतारा वाढीमुळे शेतकऱ्यांना एफआरपीत फायदा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.