Shreegauri Sawant Sakal Swasthyam
महाराष्ट्र बातम्या

Suhana Swasthyam 2023: "आई म्हणून समाजानं स्वीकारलं; पण तृतीयपंथी म्हणून नाही"

समाजात स्त्री-पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही मानाचं स्थान मिळणं गरजेचं आहे. मात्र, आमचा अस्तित्वाचा लढा अद्याप सुरूच आहे...

सकाळ वृत्तसेवा

Suhana Sakal Swasthyam 2023 Shreegauri Sawant

- श्रीगौरी सावंत

समाजात स्त्री-पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही मानाचं स्थान मिळणं गरजेचं आहे. मात्र, आमचा अस्तित्वाचा लढा अद्याप सुरूच आहे. हा लढा न्यायालयापर्यंत पोचला आणि सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला ‘स्वतंत्र’ ओळखही दिली. मात्र समाजाचं काय? आम्हाला मोकळ्या मनानं स्वीकारा, आमच्यावर उपकार करू नका, आम्हाला तृतीयपंथी म्हणून स्वीकारा, अशीच आमची आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हा मुद्दा मी ‘स्वास्थ्यम्’च्या व्यासपीठावरून लोकांना पटवून देणार आहे...

‘ताली’ची लोकप्रियता

‘गणेशची श्रीगौरी कशी झाली, हे आता विचारत बसू नका. त्यापुढं जाऊयात. आता तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करूयात,’ असं श्रीगौरी सांगतात. तृतीयपंथीयांचं संघटन करून त्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत. एवढंच नव्हे, तर ‘तृतीयपंथी’ म्हणून मुलगी दत्तक घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या व्यक्ती ठरल्या.

‘मला आई म्हणून समाजानं स्वीकारलं; पण तृतीयपंथी म्हणून नाही,’ असंही त्या सांगतात. श्रीगौरी यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ताली’ ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर विशेष गाजली. या मालिकेत अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी श्रीगौरी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

...सरकार देईना ‘अधिकार’!

तृतीयपंथी म्हणून समाजात ओळख मिळावी म्हणून २०१४ मध्ये श्रीगौरी सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या त्या देशातील पहिल्या तृतीयपंथी. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (एनएएलएसए- नालसा) यांनी तृतीयपंथी म्हणून स्वतंत्र ओळख दिली.

‘स्वतंत्र ओळख मिळून नऊ वर्षे झाली, आता तृतीयपंथीयांना स्वीकारलं जाते आहे का?’ या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ‘समाज व सरकार अजूनही तृतीयपंथीयांना स्वीकारत नाही. सर्वोच्च न्यायालयानं तृतीयपंथी म्हणून अधिकार दिला, तरीही प्रत्यक्षात अधिकार मिळत नाही, हे दु:ख आहे. शिक्षणापासून तृतीयपंथीयांना दूर ठेवलं जातं. ‘तृतीयपंथी प्रत्येक क्षेत्रात आले पाहिजेत,’ असं न्यायालयानं म्हटलं आहे.

राज्यात पोलिस भरतीसाठी ७० तृतीयपंथीयांना पुढं आणलं. त्यातील तीस जण लेखी आणि शारीरिक परीक्षेत उत्तीर्ण झाले. तरीही सरकार म्हणते, ‘आम्हाला तृतीयपंथीयांना पोलिस भरतीत आरक्षण देता येणार नाही.’ कर्नाटक, छत्तीसगडमध्ये तृतीयपंथी पोलिस आहेत. मात्र, ज्या महाराष्ट्रातून तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा लढा सुरू झाला; त्या महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना भरती प्रक्रियेत आरक्षण दिलं जात नाही.’’

तृतीयपंथीयांसाठी ‘सखी चारचौघी’

श्रीगौरी यांच्या नेतृत्वाखाली ‘सखी चारचौघी’ ही संस्था तृतीयपंथीयांसाठी कार्यरत आहे. संस्थेद्वारे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल दोन हजार तृतीयपंथीयांचं संघटन करण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी, त्यांच्यात ‘एचआयव्ही’बाबत जागृती, तसेच त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड काढून देण्यासाठी ही संस्था काम करते. याशिवाय तृतीयपंथीयांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.

याबद्दल श्रीगौरी म्हणाल्या, ‘पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना संधी मिळाल्यास लोकलमध्ये तुम्हाला तृतीयपंथी दिसणारच नाहीत. तुम्ही पर्याय उपलब्ध करून द्या ना! दुसऱ्याला सल्ला देणं सगळ्यात सोप्पं काम आहे. पण, प्रत्यक्षात आणणं अवघड आहे. प्रत्येक कार्यालयात दोन ते तीन तृतीयपंथीयांना नोकरी देणं अनिवार्य करा, मग बघा परिवर्तन होतं की नाही!’

मातृत्वाच्या ओढीतून ‘आजीचं घर’

‘मातृत्व ही एक नैसर्गिक भावना आहे. ही भावना कोणत्याही एका लिंगापुरती मर्यादित नाही. कोणावरही सहज प्रेम करता येणं, हे मातृत्व आहे,’ असं सांगत श्रीगौरी यांनी मातृत्वाची व्याख्या सर्वसमावेशक केली. याच विचारातून उपेक्षितांना आधार देण्यासाठी ‘आजीचं घर’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली.

श्रीगौरी यांच्या नेतृत्वाखाली साई सावली फाउंडेशनतंर्गत ‘आजीचे घर’ ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेत निराधार मुलांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं, एकल महिलांच्या मुलांचा सांभाळ केला जातो.

अनेक खासगी कंपन्यांमधील मनुष्यबळ विकास विभागाच्या धोरणात तृतीयपंथीयांना नोकरी देण्याचं नवं धोरण स्वीकारलं गेलं आहे. म्हणूनच आज अनेक मोठ्या शहरांमध्ये तृतीयपंथीयांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळत आहे. मग, सरकारी नोकरीत आरक्षण का दिलं जात नाही? तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सरकारी नोकरीत स्थान मिळणं आवश्यक आहे.

- श्रीगौरी सावंत, तृतीयपंथी कार्यकर्त्या

अंतर्गत लढा अधिक विदारक!

‘एकीकडं तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी सुरू असलेली लढाई, तर दुसरीकडं तृतीयपंथी समाजातील अंतर्गत लढा या दोन्हीपैकी सगळ्यात मोठा संघर्ष कोणता?’ या प्रश्नावर श्रीगौरी म्हणाल्या, ‘तृतीयपंथी समाजात जबरदस्तीनं धर्मांतर केलं जातं, हे वास्तव आहे. एवढंच नव्हे, तर तृतीयपंथी समाजात अजूनही जात पंचायत कायदा पाळला जातो.

तृतीयपंथीयांना देवदासी करतात, जोगत्या बनवतात, भीक मागायला लावतात. या विरोधात मी भांडत आहे. तुम्ही विद्रोह करता, नोकऱ्या मागता म्हणून समाजातून आम्हाला बाजूला टाकलं जातं. मात्र, आता आम्ही १७ ते २० वर्षं वयोगटातील तृतीयपंथीयांना एकत्रित करत आहोत.

‘तुम्ही अजून पाच वर्षांनी स्वतःला कुठं पाहता,’ असा प्रश्न या तरुण तृतीयपंथीयांना विचारला जात आहे. त्यानुसार त्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अजूनही तृतीयपंथीयांना जन्म देणाऱ्या त्यांच्या मूळ घरातून त्यांचा मालकी हक्क नाकारला जातो.

मूळ घरातल्यांनी स्वीकारलं, तर समाजाला स्वीकारायला वेळ लागत नाही. कारण आपला पहिला समाज हा आपले आई-वडील आहेत. तृतीयपंथी म्हणून इतका का बाऊ केला जातो, हेच कळत नाही.’

(शब्दांकन - मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT