सोलापूर : पाच दिवसांपूर्वी नवीन कार घेतली होती, सुट्टी असल्याने शिक्षक डोणगाव शिवारातील भाटेवाडी (ता. उत्तर सोलापूर) येथील सासरकडील नातेवाईकांना पेढे वाटायला गेले होते. कार झाडाखाली सावलीत लावताना नियंत्रण सुटले आणि जवळील विहिरीत कारसह ते कोसळले. कारसह बुडून शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ईरण्णा बसप्पा जुजगार (वय ४१) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरात जुजगार कुटुंबीय राहायला होते. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव मैंदर्गी असून पाच दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन चारचाकी (एमएच १३, ईसी ६०६८) खरेदी केली होती. आज (रविवारी) शाळेला सुट्टी असल्याने ते कुटुंबासह डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे गेले होते.
नवीन गाडी घेतल्याचे पेढेही वाटायचे होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते भाटेवाडी येथील शेतात कुटुंबास त्या कारमधून गेले होते. कार झाडाखाली लावताना त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार सुसाट वेगात शेतातील विहिरीत कोसळली. नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने त्यांना पाण्याबाहेर काढून सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेले. पण, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. संघाने त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
कारमधून पत्नी, मुलगा-मुलगी उतरले होते, नाहीतर...
जिल्हा परिषदेच्या वडगाव शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत ईरण्णा जुजगार हे चालकाला घेऊन ते रविवारी भाटेवाडीतील शेतात गेले होते. तेथील लोकांना पेढे वाटायचे होते. त्यासाठी ते पत्नी, मुलगा व मुलीसोबत त्याठिकाणी गेले होते. शेतात पोचल्यावर गाडीतून सर्वजण खाली उतरले. पण, गाडी झाडाखाली लावण्यासाठी ते एकटेच कारमध्ये बसले. त्याचवेळी कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यांची पत्नी-मुलांच्या डोळ्यासमोरच ईरण्णा यांचा करुण अंत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.