पुणे - जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आता ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाने आदेश काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या आदेशाचे स्वागत केले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. छेरिंग दोरजे यांनी हा आदेश काढला आहे. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३’ नुसार पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे) आणि पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाने सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारी समितीने आदेशाचे स्वागत केले आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गतवर्षी राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रा काढली होती.
या आदेशामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अनेक दिवसांपासूनची एक मागणी पूर्ण झाली आहे. हे कक्ष स्थापन झाल्यावर पोलिसांनी जिल्हावार माहिती जनतेसमोर जाहीर करावी. जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षात घेऊन येतील, असे या पत्रकात म्हटले आहे.
‘अंनिस’च्या राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, प्रशांत पोतदार, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, फारुक गवंडी, विनोद वायंगणकर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रवीण देशमुख, डॉ. अशोक कदम, प्रकाश घादगिने यांनी हे पत्रक काढले आहे.
पोलिस प्रशासनाचे आश्वासक पाऊल - ‘अंनिस’
‘अंनिस’च्या राज्य समितीच्या सदस्य मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव याबाबत म्हणाल्या की, ‘प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिल्याबद्दल राज्य पोलिस प्रशासनाचे अभिनंदन. महाराष्ट्र पोलिसांचे हे आश्वासक पाऊल आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.