मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रामध्ये वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. याचबरोबर या पत्रात शरद पवार यांच्या राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.
वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर आता यावार राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रीया येत आहेत.
अशात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वाझेने लिहिलेल्या पत्रावर शंका उपस्थित करत, "सचिन वाझेला हे पत्र फडणवीसांनीच लिहायला लावले नाही कशावरून?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अंधारे पुढे म्हणाल्या की, "फडवणीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांनी महाराष्ट्र नासवला, महाराष्ट्रीची संस्कृती पायदळी तुडवली इथल्या कायदा सुव्यवस्थेचा वापर विरोधकांना जायबंदी करण्यासाठी केला."
या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "सचिन वाझेच्या पत्रावर जेव्हा वातावरण तापते तेव्हा प्रश्न पडतो की, सचिन वाझे म्हणजे हरिशचंद्र आहे का? सचिन वाझे ज्या वेळेला हे आरोप करत आहे, ती वेळ महत्त्वाची आहे. कारण अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर जे गंभीर आरोप केले त्यानंतरच वाझेचे हे पत्र समोर आले आहे. जर वाझेला पत्रच लिहायचे होते तर तो इतके दिवस का शांत होता? त्याला पत्र लिहायचेच होते तर न्यायसंस्थेला लिहायचे होते. ते पत्र फडणवीसांनाच का लिहिले जातेय. फडणवीस स्वताच संशयाच्या भोवऱ्यात आहेत."
सध्या तुरुंगात असलेला मुंबई पोलिसांचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
या पत्रात वाझे म्हणाला की,"जे काही घडले आहे त्या सर्व गोष्टींचे पुरावे माझ्याकडे आहेत. अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे स्वीकारायचे. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आणि सीबीआयकडे आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी मी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचे नावही आहे."
२०२१ च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही सचिन वाझे आरोपी आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन आणि साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
दरम्यान अँटिलिया प्रकरण एनआयएकडे हस्तांतरित होण्यापूर्वी सचिन वाझेच या प्रकरणाचा प्रमुख तपास अधिकारी होता. पण यामधील वाझेचा सहभाग उघड झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने वाझेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटमधून काढून टाकले होते.
सचिन वाजे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो अशा प्रकरणांमध्ये आणि वादात अडकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.