सकाळ वृत्तसेवा
पुसद : ‘‘सामाजिक आरक्षणात राजकारणातील फायदे तोटे पहायचे नसतात. समाजातील सामंजस्य, बंधुभाव या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असते. दुर्दैवाने राजकीय पक्ष या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. समाजातील हळूहळू होणारे विभाजन धोक्याचे वाटते. आरक्षणाचा मुद्दा आता चावडीवर राहिला नाही, तर चुलीपर्यंत गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने यावर लवकर निर्णय घ्यावा,’’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे, असे मत आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा पुसदमध्ये शनिवारी (ता .तीन) पोचली. त्यानंतर रविवारी विश्रामगृहावर अॅड.आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोनदा बैठका झाल्या, तरीही जरांगे पाटील यांच्या ‘ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण’ या मुद्यावर तोडगा निघत नाही, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर आमच्याशिवाय कोणीही भूमिका घेतली नाही.
मराठवाड्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील झाला असून दोन्ही समाजामध्ये कट्टरता येऊ लागली आहे. मतदारांच्या विचारांचे सरकार निवडून आणणे हे मतदारांच्या हाती आहे. मात्र, आरक्षण तपासण्याचा, वैधता ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. तेव्हा आपण उपोषण, आंदोलनातून काय साध्य करणार, आमदारांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आरक्षण बचाव आंदोलनातून आरक्षण विषयक सीमा आणि मर्यादा मांडल्या. त्यामुळे गाड्या जाळल्यानंतर पुन्हा अनुचित प्रकार घडला नाही. आज गावात कुणबी मराठा व ओबीसी असे दोन गट पडले आहेत. आरक्षणासाठी कुणबी स्वतःला ओबीसी मानतो आणि सत्तेत मराठासोबत बसतो. तो सामाजिक संबंध ठेवत नाही, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.
कुणबी, मराठ्यांना मतदान करू नका
मानोरा (जि. वाशीम) ः ॲड. प्रकाश आंबेडकर हे रविवारी पोहरादेवी येथे होते. येथे त्यांनी प्रारंभी महंत सुनील महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत देवी-देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर आरक्षण बचाव यात्रा रॅलीत बोलताना आंबेडकर यांनी कुणबी, मराठा उमेदवाराला मतदान न करता ओबीसी उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर महंत रमेश महाराज, वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रमुख विनोद राठोड यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.