सोलापूर : राज्यातील धरणासह मध्यम व लघू प्रकल्पासह विहिरीतील पाणीपातळी खालावू लागली आहे. पालघर, ठाणे, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमधील पाच गावे, 16 वाड्यांवर नऊ तर सोलापूर शहरात 21 टॅंकर सुरू झाले आहेत. संभाव्य टंचाईवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील नाशिक, औरंगाबाद, नागपूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह 23 जिल्ह्यांचा टंचाई आराखडाच शासनाला पाठविला नसल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
संभाव्य टंचाईची स्थिती...
टंचाईग्रस्त गावे
9,272
अंदाजित टॅंकर
680
टंचाई आराखडा
400 कोटी
नळ-पाणीपुरवठा योजना दुरुस्ती
92 कोटी
पावसाळा संपल्यानंतर भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा अंदाज घेऊन त्याचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला दिला जातो. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या प्रत्येकी तीन महिन्यांतील टंचाईचा संभाव्य आराखडा तयार केला जातो. मात्र, उन्हाळा सुरु झाला, तरीही यंदा हे आराखडे तयार झाले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या भागातील टंचाईचा आढावा घेऊन संभाव्य कृती आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. तरीही अवघ्या 13 जिल्ह्यांनीच शासनाकडे टंचाई कृती आराखडा पाठविला असून राज्याचाही टंचाई आराखडा अंतिम झालेला नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेक गावांमधील नळ तथा पाणीपुरवठ्याच्या योजनांची दुरुस्तीस अडचणी येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात टॅंकर सुरु झाला नाही, परंतु शहरातील ठराविक भागातील नागरिकांना सातत्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे उजनी धरण 100 टक्के भरलेले असतानाही आता धरणाने तळ गाठायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचा विचार करून आता एकच आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पाईपलाईन नसल्याने सुरु आहेत टॅंकर
सोलापूर शहरात सध्या 21 टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाईपलाईन नसलेल्या ठिकाणी प्राधान्याने हे टॅंकर सुरु असून नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक कुटुंबासाठी एकावेळी एक हजार लिटरपर्यंत पाणी दिले जाते.
-सिध्देश्वर उस्तुरगी, अभियंता, पाणीपुरवठा व आरोग्य, महापालिका, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.