Tata Airbus Project 
महाराष्ट्र बातम्या

Tata Airbus Project : टाटा एअरबस प्रकल्प आणि राजकारण

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातलाच जाण्यामागे निव्वळ योगायोग?, विरोधकांनी राज्य-केंद्र सरकारला धारेवर धरलं

Komal Jadhav (कोमल जाधव)

Tata Airbus Project : आधी वेदांता- फॉक्सकॉन, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प, आणि आता टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प… हे तीनही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या तीनही प्रकल्पांचं लँडिंगही गुजरातमध्येच झालं आहे. त्यामुळे गुजरातला जाणाऱ्या या प्रकल्पांबाबत हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही? यावरुन आता राजकारणाला वेगळा रंग येणार हे नक्की.

टाटा एअरबसचा प्रकल्प नेमका काय आहे, त्याची भारताला कशी मदत होणार आहे, सांगायचं झालं, तर २२ हजार कोटींचा टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणारा तिसरा प्रकल्प आहे. शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यापासून हा राज्याला बसलेला तिसरा धक्का आहे. त्यामुळे आतातरी शिंदे-फडणवीस सरकार राज्यातले प्रकल्प, गुंतवणूक आणि रोजगाराविषयी केंद्राशी बोलून मार्ग काढणार का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

टाटा एअरबसवरुन राजकारण कसं रंगतंय?

आधी सांगितल्याप्रमाणे टाटा एअरबस हा महाराष्ट्राबाहेर जाणारा तिसरा प्रकल्प आहे. त्यातही योगायोगानं हा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे.

यावेळी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी म्हटलंय-

प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच दु:ख होतंय. मागील ३ महिन्यांत केंद्र सरकारनं महाराष्ट्राला तीन धक्के दिलेत. हा काही योगायोग आहे का, की तीनही प्रकल्प गुजरातलाच गेले आहेत. आता तरी शिंदे-फडणवीस सरकार केंद्राला बोलणार आहे की नाही?

– सुभाष देसाई, माजी उद्योगमंत्री

तर माजी उद्योगमंत्र्यांच्या आरोपांवर आताचे उद्योगमंत्री काय म्हणतात?

तर काही लोक सोशल मीडिया पाहून कमेंट करताहेत. ६ महिन्यांत महाराष्ट्राला मोठा प्रकल्प मिळणार. महाविकासआघाडी सरकारनं कागदावर काहीच काम केलं नाही. टाटा एअरबस प्रकल्पाविषयी सामंजस्य करार गेल्यावर्षीच झाला होता.

-उदय सामंत, उद्योगमंत्री

अशा शब्दात उदय सामंतांनी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याविषयी बोलताना महाविकासआघाडी सरकारकडे बोट दाखवलंय. तर तिकडे आदित्य ठाकरेंनीही ट्विटरवरुन थेट उद्योगमंत्री उदय सामंतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंनी म्हटलंय –

खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?

अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. तर तिकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी तर एक मोठा गंभीर आरोप केलाय तो म्हणजे-

महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत.

वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे. दरम्यान युकेच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा.

टाटा एअरबसचा नेमका प्रकल्प काय आहे?

या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाच्या सी-२९५ या मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे. टाटा समूह आणि युरोपीयन कंपनी एअरबसच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. एअरबस ही युरोपमधील महत्वाची विमान निर्मिती करणारी कंपनी आहे. भारतात सी-२९५ विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी एअरबस ही पहिली परदेशी कंपनी आहे. भारत सरकार आणि एअरबस कंपनीत झालेल्या सामंजस्य करारानुसार, पुढील ४ वर्षात पहिली १६ विमानं स्पेनमध्ये निर्मिती केली जातील आणि भारतीय हवाई दलाला सोपवली जातील.

त्यानंतर ४० विमानांची निर्मिती गुजरातमधील बडोद्यात करण्यात येणार आहे. सी २९५ च्या द एअरबस डिफेन्स अँड स्पेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमला भारतीय नियामक संस्था डीजीसीएनं परवानगी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं राज्यातील रोजगारावर मोठा परिणाम होणार हे निश्चित.

टाटा एअरबसचा प्रकल्प आधी कुठे होणार होता, आता कुठे होतोय?

टाटा एअरबसचा प्रकल्प आधी नागपुरातील मिहान इथे होणार होता. पण, आता गुजरातमधील बडोद्यात हा प्रकल्प होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० ऑक्टोबरला या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण स्वदेशी असेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून बनणाऱ्या सी-२९५ विमानाची वैशिष्ट्यं काय आहेत?

सी-२९५ विमान हे भारतीय वायुदलासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. मोठ्या संख्येनं सैनिकांची आणि सामानाची वाहतूक करण्यासाठी सी-२९५ महत्वाची भूमिका बजावेल त्यामुळे आता टाटा एअरबस प्रकल्पावरुन रंगलेलं राजकारण पाहिलं आणि विरोधकांच्या मागणीचा विचार केला तर शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेतं? केंद्र सरकार खरंच महाराष्ट्राला नवा प्रकल्प देणार का? उद्योगमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात खरंच ६ महिन्यात नवा प्रकल्प येणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील.

- कोमल जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT