सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षक कमी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरतीला सुरवात होणार आहे. स्वातंत्र्य दिनादिवशीच भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरु होईल. पहिल्या टप्प्यात ३० हजार रिक्तपदे भरण्याचे जाहीर केले, पण सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक व संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमुळे भरतीतील पदे कमी होतील, अशी वस्तुस्थिती आहे.
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आता ‘पवित्र’मधूनच होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती (जाहिरात) बिंदुनामावलीसह त्याठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर त्या शाळांमध्ये राज्य पातळीवरूनच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जातील. त्यांची मुलाखत घेऊन संस्थेने एकाची निवड करायची आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांची मनमानी कायमची बंद होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड मेरिट यादीनुसार होईल. ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा, जातप्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावा लागणार आहे. तत्पूर्वी, त्या उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागेल. १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत होईल. त्यानंतर शेवटी २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान निवड झालेल्यांचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक केली जाणार आहे.
शिक्षक भरतीचे संभाव्य वेळापत्रक
पोर्टलवर जाहिराती अपलोड
१५ ते ३१ ऑगस्ट
उमेदवारांचा प्राधान्यक्रम
१ ते १५ सप्टेंबर
उमेदवारांची पडताळणी
११ ते २१ ऑक्टोबर
जिल्हास्तरीय समुपदेशन
२१ ते २४ ऑक्टोबर
‘सेवानिवृत्त’मुळे भरतीतील पदे कमी होणार
राज्यातील जवळपास १५ हजार शाळांची पटसंख्या १० व २० पर्यंतच आहे. अशा द्विशिक्षकी शाळा बंद करण्याऐवजी त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी ‘शिक्षण सारथी’ योजना सुरु केली आहे. त्यानुसार ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय झाला आहे. या १२ ते १५ हजार सेवानिवृत्त शिक्षकांमुळे नव्याने होणाऱ्या भरतीत पदांची संख्या कमी होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. आता संचमान्यता पूर्ण होताच भरतीला सुरवात होणार असून तत्पूर्वी, बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.