पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षकांच्या रिक्त पदांवर ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’मधील गुणांच्या आधारे भरती करण्यात येत आहे.
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या स्व प्रमाणपत्रात आवश्यक माहिती नमूद करण्याची सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला.
राज्यातील शिक्षण सेवक आणि शिक्षक पद भरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत झाली. या परीक्षेत दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीसाठी उपस्थित होते.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे शिक्षण सेवक आणि शिक्षक या रिक्त पदांची भरती गुणवत्तेनुसार करण्यात येत आहे. या पदभरतीच्या प्रक्रियेची सुरवात शुक्रवारपासून झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.
या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबतच्या जाहिराती मुलाखतीशिवाय या प्रकारातील असणार आहेत. तर खासगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबतच्या जाहिराती या मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील असणार आहेत.
उमेदवाराची अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, गट आणि विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार आणि गुणवत्तेनुसार नियुक्तीबाबतची शिफारस करण्यात येणार आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाकडून उमेदवारांची कागदपत्र तपासून नियुक्ती आदेश देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
‘शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर यापूर्वी भरलेली माहिती स्व प्रमाणित करावी लागणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती, तर पुढील टप्प्यात ५० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. शिक्षक हे अतिशय पवित्र पद आहे.
मुलांवर संस्कार करण्याची आणि त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. त्यामुळे ज्या शाळेची आपण निवड करणार आहात, त्यावर शिक्षकांचे प्रेम असले पाहिजे. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे. राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.’
- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.