Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: सावरकरांबाबत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार...'; ठाकरे गटाने पुन्हा सुनावले खडेबोल

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापलं

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या या व्यक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बोलताना आम्ही त्यांच्या व्यक्तव्याशी सहमत नसल्याचंही सांगितलं. तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे गट जात असल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाने केली आहे. अशातच शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपला सडेतोड उत्तर देत राहुल गांधींच्या विधानाबाबतही स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले.

राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय. वीर सावरकर हे अंदमानच्या काळय़ा पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता.

देशातील नफरत, द्वेषाचे पसरत चाललेले जहर, महागाई, बेरोजगारी या मुद्दय़ांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण 15 किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात जनता चालत असते. राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे. राहुल गांधी यांचे श्रम, कष्ट त्यामागे आहेत; पण अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व सर्व केलेल्यावर पाणी पडते. असे का व्हावे?

महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. राहुल गांधी यांनी हिंगोलीत विधान केले की, ‘‘सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे.’’ त्याशिवाय, ‘मला मुक्त करा, मी बाहेर येताच आपल्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काम करीन,’ असेही सावरकर यांच्या याचिकेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले व त्याबाबतची कागदपत्रे पत्रकारांसमोर फडकवली. या सगळय़ाची गरज नव्हती, पण हे राहुल गांधी यांना सांगायचे कोणी? सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते.

ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले. ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावलेले या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी 10 वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तुरुंगात सडत मरण्यापेक्षा बाहेर पडून थांबलेले क्रांतिकार्य पुढे न्यावे, असे त्यांना वाटत असावे. पुन्हा इकडे बाहेरही स्वतः महात्मा गांधी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱयाची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे! राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT