चंदगड: चंदगड तालुक्यात गेल्या काही वर्षात स्थानिक गुन्ह्यात पोलिसपाटलांची कर्तव्यभावना संशयित आरोपींच्या दृष्टीने नाराजीची ठरत आहे. याच रागातून पोलिस पाटलांवर खोटे दावे दाखल करणे, हल्ले करण्यापासून ते खुनापर्यंत मजल गेली आहे.
पोवाचीवाडी येथील घटनेने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अवघ्या पाच हजार रुपये मानधनासाठी जीवाची बाजी लावायची का? असा प्रश्न पोलिस पाटील आणि कुटुंबीयांना पडला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील एका पोलिसपाटलाने गावात दारू पिऊन सतत दंगा करणाऱ्या एका व्यक्तीला दम भरला. तो स्वतःच लडखडत गटारीत पडला. त्यात त्याचा पाय मोडला. पोलिसपाटलाने केलेल्या मारहाणीत आपला पाय मोडला अशी तक्रार त्याने दिली.
तीन वर्षे न्यायालयात फेऱ्या मारल्यावर पोलिस पाटील निर्दोष झाले. नाहक वेळ आणि पैसा गेला. एका गावातील पोलिस पाटलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
एकाने मटका अड्ड्यावरील छाप्यात पोलिसांना मदत केल्याचा राग मनात धरुन त्याच्यासह शिक्षण घेणाऱ्या, नोकरीला असलेल्या मुलांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. शिक्षण घेणाऱ्या या मुलांना पुढे नोकरीच्या वेळी हा गुन्हा अडचणीचा ठरु शकतो.
त्यातून त्यांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता असते. या प्रकारामुळे पोलिस पाटील आणि कुटुंबिय सतत एका दडपणाखाली वावरताना पहायला मिळतात. असेच प्रकार अनेक पोलिस पाटलांच्या बाबतीत घडले आहेत.
विशेषतः वरातीत डॉल्बी बंद केल्यावर पोलिस पाटीलच सर्वांच्या नाराजीचे केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कर्तव्यभावना निभावताना अनेक शत्रू तयार होत आहेत. बचावासाठी शासनाकडून कोणतेही खास नियम नाहीत. ज्या पोलिस खात्यासाठी ते ग्रामीणस्तरावर काम करतात, त्यांच्याकडूनही पाठराखण होत नसल्याची सार्वत्रिक खंत आहे.
काही वेळा तर कुंपणच शेत खाण्याचा प्रकार जिव्हारी लागणारा आहे. कर्तव्य निभावताना जीवावर बेतणारे प्रसंग निर्माण होत आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांना आत्मबळ देण्याची गरज आहे.
सरपंचांचीही हीच अवस्था...
एका सरपंचाने दोन भावांतील वादात तडजोड घडवली. त्यापैकी एकाला आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बळावली. त्याने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुपारी देऊन सरपंचांवर हल्ला घडवून आणला. सुदैवाने ते त्यातून बचावले. मात्र, त्यांच्यासह कुटुंबाला मानसिक त्रास झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.