सोलापूर : जुलैपर्यंत उणे पातळीतील उजनी धरण ४ ऑगस्टपूर्वी भरले आणि धरणातून पाणी भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे. अजूनही उजनीत दौंडवरून २८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.
सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील १३० हून अधिक ग्रामपंचायती, एमआयडीसी व साखर कारखान्यांना आणि दीड लाख हेक्टरला उजनीच्याच पाण्याचा आधार आहे. शेतीशिवाय एकूण ४३ योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.
या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेर शेतीला पहिले आवर्तन तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला दुसरे आवर्तन आणि मेअखेर गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडले जाऊ शकते. धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होणार असून, समितीची बैठक आता नवीन सरकार सत्तेवर आल्यावर डिसेंबरअखेर होणार आहे.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
१२३.२८ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५९.६२ टीएमसी
धरणातील पाण्याची टक्केवारी
१११.२८ टक्के
दौंडवरून येणारा विसर्ग
२८०० क्युसेक
देगाव योजनेतून पहिल्यांदा सुटणार पाणी
दक्षिण सोलापूर व अक्कलकोटमधील अनेक गावांना फायदा होईल अशा देगाव उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्ण होईल. सध्या देगावजवळील रेल्वे ब्रीजवरील काम सुरू असून १५ दिवसांत ते पूर्ण होईल, अशी सद्य:स्थिती आहे. जानेवारी- फेब्रुवारीत सुटणाऱ्या पहिल्या आवर्तनाचे पाणी देगाव उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच सुटणार आहे. सुरवातीला दक्षिण सोलापुरातील सहा हजार हेक्टरला त्यातून पाणी मिळणार आहे.
समांतर जलवाहिनीमुळे १५ टीएमसी पाण्याची बचत
सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून समांतर जलवाहिनी टाकली जात असून, त्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर भीमा नदीतून सोलापूर शहराच्या पिण्यासाठी पाणी सोडायचे बंद होईल. त्यामुळे अंदाजे १२ ते १५ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. ते पाणी शेतीसाठी किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.