Smart City Project Sakal
महाराष्ट्र बातम्या

स्मार्ट सिटी सोलापुरातील पाण्याची भयानकता! 1.24 लाख कुटुंब इलेक्ट्रिक मोटारी लावूनच भरतात पाणी; शॉक लागून अनेकांचा मृत्यू, तरीपण परिस्थिती ‘जैसे थे’च

तात्या लांडगे

सोलापूर : नळ कनेक्शन घेताना पाणी विकणार नाही, कमी प्रेशर आला तरी तक्रार करणार नाही व पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावणार नाही, असे प्रत्येकाकडून लेखी घेतले जाते. मात्र, सोलापूर स्मार्ट सिटीतील एक लाख ३२ हजार नळ कनेक्शन धारकांपैकी तब्बल सव्वालाख कुटुंबातील लोक नळाला इलेक्ट्रिक मोटार लावूनच पाणी भरतात अशी वस्तुस्थिती असल्याचे खुद्द महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले.

उजनी धरण भरलेले असो किंवा रिकामे, सोलापूरकरांना जवळपास २० वर्षांपासून नियमित पाणी मिळत नाही. दुसरीकडे शहराचा विस्तार झाला आणि नळ कनेक्शनही वाढले, मात्र पाणीपुरवठ्याची अंतर्गत पाइपलाइन लोकसंख्येच्या प्रमाणात बदलली गेली नाही. शहरातील विडी घरकूल, प्रियांका नगर, बॉम्बे पार्क, वसंत नगर, सुशील नगर, आंबेडकर नगर (देगाव रोड), निराळे वस्ती, यश नगर, शेळगी, जुळे सोलापूर भागात अशी स्थिती आहे.

सर्वजण नळाला इलेक्ट्रिक मोटार लावतात हे माहिती असतानाही महापालिकेकडून डोळेझाक केले जाते. कारण, नियमित व पुरेशा दाबाने पाणी देता येत नाही. स्मार्ट सिटीतील ही दुरवस्था समांतर जलवाहिनी झाल्यावर तरी सुधारेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर नववर्षात (जानेवारी २०२५) किमान दोन दिवसाआड आणि वेळेत (अवेळी नाही) पाणी मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

समांतर जलवाहिनी कार्यान्वित झाल्यावर स्थिती निश्चित बदलेल

सोलापूर शहरातील ९० टक्के कुटुंबातील लोक नळाला इलेक्ट्रिक मोटार लावूनच पाणी भरतात ही वस्तुस्थिती आहे. स्मार्ट सिटीतून शहराच्या गावठाण भागात नवीन पाइपलाइन टाकली, तरीदेखील तेथील नागरिक मोटारी लावूनच पाणी घेतात. पण, समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर जानेवारीत पाण्याची वेळा वाढविण्याचे नियोजन असून त्यावेळी इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी घेण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

दुर्घटना घडणार नाही, याची सर्वांनीच घ्यावी खबरदारी

घरातील कोणतेही विद्युत उपकरण जोडताना अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करावी. बटने बंद करून उपकरण जोडावे. वायरिंग सुरक्षित असावे. पाणी भरताना पायात चप्पल नसते, पाण्याने पाय ओले झालेले असतात आणि अशावेळी बटन बंद करताना किंवा तुटलेल्या वायरला धक्का लागताच अपघात होवू शकतो. त्यामुळे अशा दुर्घटना होणार नाहीत याची सर्वांनीच खबरदारी घ्यायला हवी.

- आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

अपार्टमेंट, दोन-तीन मजली इमारतीत पाणी घेण्यासाठी लावतात मोटारी

ज्या शहरात दररोज पाणी मिळायचे, त्या स्मार्ट सिटीत सध्या पाच दिवसाआड पाणी मिळतेय. पाणीपट्टी भरूनही शहरातील सर्वांना समान प्रमाणात पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. नळाला पाणी सोडल्यानंतर सुरवातीपासूनच नागरिक इलेक्ट्रिक मोटारी लावतात आणि त्यामुळे टोकावरील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे तेही मोटारी लावूनच पाणी भरत आहेत. शहरातील एक-दोन मजली इमारती किंवा उंच अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर सर्वांसाठी पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने अनेकजण नळाला इलेक्ट्रिक मोटारी लावतात. त्यामुळे इतरांना कमी दाबाने पाणी येते म्हणून तेही मोटारी लावतात, अशी सद्य:स्थिती आहे.

शॉक लागून मृत्यू झालेल्यांसाठी जबाबदार कोण?

सोलापूर शहरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने लागेल तेवढे नियमानुसार पाणी मिळाल्यास कोणीही इलेक्ट्रिक मोटार लावणार नाही, असा सर्वांनाच विश्वास आहे. दुसरीकडे अवेळी आलेले पाणी किती तास राहील, याची नागरिकांना शाश्वती वाटत नाही. वीजपुरवठा खंडित झाला, पाइपलाइनला गळती लागली तर पुन्हा पाणीपुरवठा वेळेत होईल की नाही, याचीही खात्री नाही. कधी चार तर कधी पाच दिवसाआड पाणी मिळत असल्याने ९० टक्के कुटुंबातील लोक नळाला इलेक्ट्रिक मोटार लावतात. त्यात दीड वर्षांत सात वर्षीय चिमुकलीसह जवळपास आठ ते दहा जणांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. अशा दुर्घटनांसाठी जबाबदार कोण, ही परिस्थिती बदलणार कधी, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

शहरातील नळ कनेक्शनची स्थिती

  • एकूण नळ कनेक्शन

  • १.३२ लाख

  • अंदाजे इलेक्ट्रिक मोटारी लावणारे

  • १.२४ लाख

  • मिळेल तेवढे पाणी घेणारे

  • ८,०००

  • पाण्याच्या वेळा

  • पहाटे ४ व रात्री ८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT