माकपच्या कार्यकर्त्यांवरील पोलिस दडपशाहीचा निषेध : आडम मास्तर Canva
महाराष्ट्र बातम्या

कामगारांच्या हक्कासाठी २२५ गुन्हे अंगावर घेणारा ‘मास्तर’! नववी उत्तीर्ण नरसय्या आडम यांचा संघर्षमय प्रवास

अनेक मोठ्या संपांतून मार्ग निघाले, मागण्या मान्य झाल्याने कामगारांचा विश्‍वास वाढला. अनेकवेळा समन्वयातून मार्ग काढला. आजतागायत २२५ केसेस दाखल झाल्या, दोनशेचा निकाल लागला. अनेकवेळा जीवघेणे हल्लेही झाले. कामगारांच्या प्रेमामुळे त्यातून सहीसलामत बचावलो.

अभय दिवाणजी - सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आयुष्यभर संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्क व अधिकारांसाठी तसेच योग्यवेळी कारखानदारांचीही बाजू घेणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त आत्मचरित्राचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीवर प्रकाश टाकणारी विशेष मुलाखत...

शून्यातून नव्हे; अक्षरशः वजाबाकीतून जमापुंजी

सोलापुरातील अत्यंत दुर्लक्षित विडी कामगारांसाठी दोनवेळच्या रोजी-रोटीची जुळवणी करणे जिकिरीचे असताना, त्यांना हक्काचा निवारा मिळवून दिल्यानंतर मनाला एकप्रकारचे सात्त्विक समाधान मिळाले, ते अवर्णनीय असेच होते, यातून मातृ वचनाची पूर्तता केली अशा शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या नारायण आडम (मास्तर) यांनी आपल्या हृदयातील एक कप्पा रिकामा केला. आपल्या आयुष्यावर प्रकाश टाकताना ते भूतकाळात रमले होतेच, तसेच भविष्याचा वेध घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. तारखेवार तपशील सांगताना त्यांनी आपला रंगतदार असा जीवनपटच उलगडला.

संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अधिकार व न्याय्य हक्कांसाठी नेहमीच मोर्चा, आंदोलन, हरताळ, संप, खड्या आवाजातील भाषण यातून सोलापुरात आडम मास्तर परिचित. विधानसभेतील त्यांचे जोरदार भाषण, प्रश्‍नांची मांडणी, त्यांची करून घेतलेली सोडवणूक ही एक हातोटी... इतकेच मास्तर नजरेसमोर आलेले. दत्तनगर (सोलापूर) येथील पत्र्याच्या शेडमधील माकप कार्यालयात दोन तास त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची मुद्रा अगदी प्रसन्न तर उष्णतेमुळे घामाच्या धारांमध्ये माझ्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती.

तापमापीचा पारा ४० अंशापुढे सरकत होता. थंडगार पाण्याच्या बाटलीतील पाणीही पाच-सात मिनिटात गरम होत होते. गप्पांवेळी त्यांच्या छोट्या पिनच्या चार्जरच्या मोबाईलवर (इनकमिंग, आउटगोइंग) आलेल्या कॉलमध्येही त्यांच्या मुलाखतीची लिंक तुटत नव्हती. ‘ए मेरे वतन के लोगो...’ या देशभक्तिपर गीताच्या रिंगटोनमुळे त्यांच्या वेगळेपणाला आणखीनच उजाळा मिळाला. वडील स्वातंत्र्यसैनिक (कै.) कॉ. नारायणराव आडम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसे गोवा मुक्ती संग्रामातील लढवय्ये होते. कामगारांसाठी सतत लढा देत चळवळ उभी करताना सोलापुरात

कम्युनिस्ट पक्षाची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या कार्याचा, चळवळीचा, विचारांचा वारसा घेऊन आडम मास्तर यांनी सोलापुरात कामगार चळवळीस सुरवात केली. वडील गिरणी, आई कै. लक्ष्मीबाई विडी कामगार, तीन भाऊ, तीन बहिणी असे मोठे कुटुंब. कमावणारे कमी अन् खाणाऱ्यांची संख्या अधिक यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर कायमच. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे वडिलांना अनेकवेळा अंडरग्राउंड व्हावे लागे. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने कर्जाचा डोंगर कायम असे. एकदा पकड वॉरंट निघाले असता सर्व कुटुंबाने अहमदाबाद गाठले. १९४१ मध्ये ते पुन्हा सोलापूरला आले.

घरातील सर्वजण अशिक्षित. माझं शिक्षण कसंबसं नववीपर्यंत. अक्षर सुंदर. गणितात प्रचंड हुशार, त्या काळात शहरात गणितात ९९ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकाविलेला. त्यामुळे त्या काळात उच्च न्यायालयात कामगारांसाठी लढणाऱ्या ॲड. सुळे यांच्याप्रमाणे आपला मुलगाही मोठा बॅरिस्टर व्हावा, अशी वडिलांची इच्छा होती. परंतु नववीपर्यंतच शिक्षण घेता आल्याने आडम यांच्याकडून वडिलांची अपेक्षा पूर्ण झाली नाही; पण आपल्याबरोबरीने मुलगा कामगार चळवळीत आल्याचा अभिमान मात्र वाटला.

प्राथमिक शिक्षणासाठी दररोज तीन कि.मी.ची पायपीट ठरलेली. एकाच युनिफॉर्मवर दीड वर्षे काढायची. सणासुदीचा तर गंधही नाही. एकेवर्षी तर केवळ हरभरे खाऊन जगावे लागले. भाकरी-भाजी काय असते हे सुद्धा माहिती नव्हते. त्या गरिबीच्या काळात शाळेत स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी मिळणारा युनिफॉर्म प्रचंड सुख देऊन जाई.

शाळेत स्वातंत्र्यदिनी गायलेल्या गाण्यामुळे एक युनिफॉर्म जादा मिळाल्याचीही आठवण डोळ्यात पाणी आणणारी ठरली. मिलिटरीत जाण्याचे मोठे स्वप्न बाळगल्याने स्काउटच्या युनिफॉर्मसाठी वडिलांकडे तगादा लावला, तो मिळाल्यानंतर जग जिंकल्याचा आनंद झाला होता. तीन वर्षे तो वापरला गेला होता. अशिक्षित वडील व त्यांच्या सहकाऱ्यांना कम्युनिस्टांचे मुखपत्र ‘युगांतर’ वाचून दाखविताना वडिलांना माझ्याविषयी प्रचंड अभिमान वाटत असे. विजापूरच्या सहलीसाठी पाच रुपये जमा न केल्याची खंत बाळगताना एक दिवस विमान प्रवासाची प्रतिज्ञा आमदार (१९७८) झाल्यानंतर नागपूर अधिवेशनावेळी पूर्ण झाली.

पद्मशाली समाजाचे नेते गंगाधरपंत कुचन हे दरवर्षी शिक्षणासाठी वह्या व पुस्तके देत, त्यावर शिक्षण झाले. नववीत असताना संगतीतून चोऱ्या, पत्ते, जुगार अशी व्यसने लागल्याने हा फार विपरीत परिणामाचा काळ गेला. गल्लीत येण्यासही बंदी होती. त्यावेळी रूपाभवानी मंदिराजवळील मारुतीच्या देवळात मुक्काम होता.

आई दररोज जेवण घेऊन येत, ती रडत-रडत समजावून सांगत असे. नंतर मात्र माझ्यात आमूलाग्र बदल झाला. पैसा कमावणे हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून पडेल ती कष्टाची कामे केली. नंतर प्रसाद सोसायटीच्या सचिवपदावर काम केले. परंतु बंडखोर व चळवळ्या स्वभाव गप्प बसू देत नव्हता. शासनाकडून मिळणाऱ्या दहा टक्के रिबेटचा म्हणजे कोट्यवधींचा लाभ उठवण्याविरुद्ध सहकार आयुक्तांसमोर पोलखोल केली. त्यामुळे नोकरीस मुकावे लागले. परंतु स्वाभिमान गहाण ठेवला नसल्याबद्दल वडिलांनी शाबासकीची थाप दिली.

१९६६ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. राजकीय जीवन प्रवास येथूनच सुरू झाला. १९६७ मध्ये विधानसभा निवडणुकीत वडिलांबरोबर हिंदू महासभेच्या वि. रा. पाटील यांना काँग्रेस विरोधकांनी (संयुक्त समिती) पाठिंबा दिला होता. त्यांचा प्रचार केला. कार्यालयच नसल्याने गुरुवार पेठेतील चौकात एका दगडावर बसून कामगारांसाठी काम सुरू झाले. त्या भागातील रेडिमेड उद्योगातील कामगारांशी संवाद, चर्चा, चहापान होत असे.

याच काळात एका बैलगाडीतून एकच पोते वाहण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्तीविरोधात बैलगाडी मोर्चा काढला. चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना चूक कळल्याने हा आदेश त्यांनी मागे घेतला. पहिल्याच यशस्वी आंदोलनाने आत्मविश्‍वास दुणावला. परंतु सोलापुरात इंटक, आयटक, भामसंघ, हिंद मजदूर सभा अशा मातब्बर संघटनांमुळे नव्या कामगार संघटनेस वावच नव्हता. तरीही यंत्रमाग, विडी कामगारांच्या संघटनेची उभारणी केली. कामगारांच्या मूळ मागण्यांसाठी सतत पाठपुरावा केला. प्रसंगी संप, हरताळ, मोर्चे, आंदोलने केली.

नववीपर्यंत शिक्षण झाल्याने एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस लागलो. तेव्हापासून ‘मास्तर’ ही उपाधी लागली. विद्यार्थ्यांना अंकगणितात तरबेज करण्यात यश मिळाले. घर अत्यंत लहान असल्याने मारुती मंदिरात मुक्काम असे. तेथेच शाळा भरत होती. १९६८ मध्ये महापालिका निवडणूक लढविली. त्यास स्थगिती मिळाल्यानंतर १९६९ मध्ये पुन्हा लागलेल्या निवडणुकीत चोरीचा आरोप केलेल्या इसमानेच माझे मतदान प्रतिनिधी म्हणून काम पाहिले; हेच आयुष्यातील मोठे यश होते. शून्यातून नव्हे वजाबाकीतून जग उभारण्याची ताकद निर्माण झाली.

अनेक मोठ्या संपांतून मार्ग निघाले, यशस्वी संप, मागण्या मान्य झाल्याने कामगारांचा विश्‍वास वाढला. अनेकवेळा समन्वयातून मार्ग काढला. आजतागायत २२५ केसेस दाखल झाल्या, त्यातील दोनशेचा निकाल लागला. अनेकवेळा जीवघेणे हल्लेही झाले. कामगारांच्या प्रेमामुळे त्यातून सहीसलामत बचावलो. काही कामगारांनी माझ्यावरील हल्ला स्वतःवर झेलला. तीनवेळा आमदार, तीनवेळा नगरसेवक झालो. ही सर्व सेवा समाजासाठी वाहिली. हजारोंच्या सभा केल्या. पहिल्या लग्नाची वाताहत झाली. वाडिया हॉस्पिटलमध्ये झालेल्या संपावेळी झालेला हल्ला अंगावर झेलणाऱ्या कामिनी डोंगरे या परिचारिकेची झालेली ओळख त्यातून प्रेम अन् त्याचे रूपांतर संसारात झाले.

कॉ. गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून शरद पवार, श्री. शिंदे यांच्या सहकार्यातून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. तत्कालीन केंद्रीय गृहनिर्माण मंत्री जेठिया यांच्याकडे पाठपुरावा केला. पहिल्यांदा एक हजार घरांना मंजुरी असे चुकीचे पत्र आले. पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर दहा घरांची स्कीम मंजूर झाली. वाजपेयी यांनी या संदर्भात जेठिया यांना बोलताना, देशात आरएसएस व कम्युनिस्ट कार्यकर्तेच रचनात्मक काम करत असल्याचे सांगत कानउघाडणी केली.

घरी पाहुणा आला तर पाहुणचार करण्याची आपली पद्धत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जाहीर सभेत त्यांचे कौतुक केल्याचा ठपका ठेवत पक्षाने तीन महिन्यांसाठी आपल्याला निलंबित केले. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करणारा साधा कार्यकर्ता असल्याने या प्रकाराबाबत काही भाष्य करणार नाही. या चळवळीत १९७३ पासून चालत, १९९३ मध्ये यंत्रमाग कामगारांनी दिलेल्या सायकलवर, १९९३ पासून रिक्षा तर २०१६ मध्ये कामगारांनी जमा केलेल्या पुंजीतून इनोव्हातून प्रवास सुरू आहे.

लक्ष्यवेध...

  • - दहा हजार घरांची कॉ. गोदूताई परुळेकर विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था

  • - कॉ. मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेत ५१०० घरकुल

  • - जागतिक कीर्तीच्या रे नगर या महत्त्वाकांक्षी महा गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी सुरू

  • - रे नगर योजनेतून असंघटित कामगारांसाठी मंजूर ३० हजारांपैकी १५ हजार घरांची पूर्तता

  • - रे नगरमधील रहिवाशांसाठी पायाभूत सुविधांकरिता ३०० कोटींची मंजुरी

  • - घरकुल योजनेसाठी २० टक्के बँक ठेव योजना (७५० कोटी) रद्द करून घेतली

  • - कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील विडी घरकुल परिसरास रहिवासी झोनची मंजुरी

  • - २०२४च्या विधानसभा निवडणुकीतून पुन्हा विजयाचे स्वप्न

  • - १९२६ च्या ब्रिटिशांच्या कायद्यात बदल करून कामगार संघटनांसाठी अन्यायकारक नवा कायदा

  • - साडेबारा हजार चौरस फुटात दहा कोटींच्या पक्ष कार्यालयाची पाचमजली इमारत उभारणीचे स्वप्न

  • - आमदार पेन्शन योजनेत मंजूर ५०० रुपयांमधून ४५० कपात होऊन हाती आले ५० रुपये

मातृ वचनाची पूर्तता

वसंतदादांविरुद्ध बंडखोरी करून शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दादांनी नागपूर अधिवेशनावेळी दिग्गज नेत्यांसोबत आमदार निवासात भेट घेऊन पवारविरोधी भूमिकेसाठी मला विनवले. २५ लाख रुपये व विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा हा प्रस्ताव लाथाडल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. पवार यांनी मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यासही नकार दिल्यावर, तुमचे कोणतेही काम सांगा करेन, अशी हमी दिली.

आपल्याला आयुष्यभर निवारा मिळाला नाही. विडी कामगारांना तरी घर मिळवून देण्याचे मृत्युशय्येवर असताना आईने वचन घेतले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्री. पवार, सुशीलकुमार शिंदे, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चटर्जी, सत्यनारायण जेठिया यांच्यामार्फत प्रयत्न करून दहा हजार घरकुलांची कॉ. गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था उभी केली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते कामगारांच्या हाती चाव्या देताना आईच्या वचनाची पूर्तता केल्याचे सात्त्विक समाधान लाभले.

कामगारांचे हित, अधिकारांसाठी लढा

सोलापुरातील उद्योग, कारखान्यांतील कामगारांच्या प्रश्‍नावर, हक्क, अधिकारांसाठी सतत लढा सुरू आहे. लक्ष्मी-विष्णू मिल पिठाच्या गिरणीप्रमाणे सुरू होती. नरसिंग गिरजी मिल सरकारच्या धोरणामुळे; यशवंत, सोलापूर गिरणी नेत्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे, वेस्ट कॉटन मिल कर्जामुळे दिवाळखोरीत निघाल्याने सोलापूरच्या कामगारांची स्थिती बिकट झाली. मालकाला मिळणाऱ्या नफ्यात कामगारांचे हक्काचे किरकोळ वेतन मिळण्याची रास्त मागणी असते, त्यासाठी लढा देत असतो.

तसेच टेक्स्टाईल उद्योगावर युती सरकारच्या काळात अन्यायकारक असा चार टक्के विक्री कर लादला होता. यासाठी पाठपुरावा करून तो आदेश मागे घेण्यास लावला. हा निर्णय मालकांच्या पदरात पडला, ही जमेची बाब नाही का? धूम्रपान विरोधी कायद्यावेळी घाबरलेल्या विडी कारखानदारांना दिलासा देण्याचे काम केले. तीन वर्षांपूर्वी २८ दिवस विडी उद्योग बंद होता. यादरम्यान पाच कामगारांचा दुर्दैवी अंतही झाला. या संदर्भात लोकसभेत आवाज उठवून या उद्योगास संरक्षण देण्याचे कामही केले. माणूस असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, हीच भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT