सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज देण्याची मुदत २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत आहे. घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून मतदान करता येणार आहे. त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल. सोलापूर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ५२ हजार ७९६ मतदार आहेत.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी या चार मतदारसंघातील आमदार अवघ्या पाच हजारापेक्षा कमी मताने विजयी झाले होते. त्या निवडणुकीतील बहुतेक विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता यंदाच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातील लढती काठावरील आहेत, त्या उमेदवारांसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांचे मतदान निर्णायक ठरणार आहे.
करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपूर या पाच मतदारसंघातील ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या पाच ते सहा हजारांपर्यंत आहे. त्यामुळे या मतदारांची यादी घेऊन उमेदवार त्यांच्यापर्यंत पोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या, बंडखोरी पाहता ज्येष्ठांच्या मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
ठळक बाबी...
८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत भरून द्यावा लागणार अर्ज
मतदान केंद्रांवर येवू न शकणाऱ्या ज्येष्ठांचे मतदान १० नोव्हेंबरपासून सुरु होईल
८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या मतदानावेळी एक मायक्रो ऑब्झर्व्हर, दोन कर्मचारी, एक पोलिस असे पथक असणार
संबंधित विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे प्रतिनिधीही ज्येष्ठांच्या मतदानवेळी तेथे उपस्थित राहावू शकतात
तालुकानिहाय ८५ वर्षांवरील मतदार
तालुका मतदार
करमाळा ५७०८
माढा ५१९५
बार्शी ६८२७
मोहोळ ५१५०
उत्तर सोलापूर ४१३४
शहर मध्य ३८१०
अक्कलकोट ४३६६
दक्षिण सोलापूर ३३५६
पंढरपूर ५३२९
सांगोला ४२२१
माळशिरस ४७००
एकूण ५२,७९६
ज्येष्ठांची मते ठरू शकतात निर्णायक
पक्षनिहाय उमेदवारांची संख्या, भरमसाट बंडखोर उमेदवार, मराठा आरक्षणाचा जरांगे पाटील फॅक्टर, धनगर आरक्षणाचा प्रश्न या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीत आमदार विजयी होण्याचे मार्जिन (मताधिक्य) फार नसणार आहे. मागच्या निवडणुकीतही अनेक आमदार पाच हजारांपेक्षा कमी मतांनी विजयी झाले होते. याही निवडणुकीत अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून ज्येष्ठ नागरिकांची मते काही उमेदवार विजयी होण्यासाठी निर्णायक ठरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.