loksabha election solapur
महाराष्ट्र बातम्या

मतदारांना स्लीप पोचविण्यासाठी शिक्षकांची अनोखी शक्कल! 3599 बीएलओंवर 36.56 लाख मतदारांना घरोघरी स्लीप देण्याची जबाबदारी; ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी बसची सोय

तात्या लांडगे

सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख ५६ हजार ८०३ मतदार आहेत. त्या सर्वांना मतदार स्लीप देण्याची जबाबदारी अवघ्या तीन हजार ५९९ बीएलओंवर असून त्यातही सर्वाधिक बीएलओ जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकच आहेत. त्यांच्यासमोर आता अवघ्या सहा दिवसांत सर्व मतदारांपर्यंत स्लीप पोच करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे गावांचा आठवडी बाजार गाठून बीएलओ मतदारांना स्लिपा पोच करीत आहेत.

मतदानाची घटलेली टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने देखील विविध माध्यमातून प्रयत्न केले आहेत. शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्यांच्या पालकांनाही आवाहन करायला लावले आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकजण सकाळी दहापूर्वीच घर सोडत आहेत. काहीजण दैनंदिन कामावर तर काहीजण शेतात जात आहेत. त्यामुळे बीएलओंना अनेक मतदारांची भेटच घडत नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्या गावात आठवडी बाजार आहे, त्या गावातील मतदारांना तेथे गाठून स्लिपा दिल्या जात आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी देखील हे बीएलओ प्रत्येक मतदान केंद्रांवर असणार आहेत. ज्यांना स्लिपा मिळालेल्या नाहीत, त्यांना त्याठिकाणी दिल्या जाणार आहेत. स्लिपा देताना ‘मतदानाला यायचं हं, आणि येताना ओळखपत्र पण सोबत आणायचं’ असे आवाहन देखील ते मतदारांना करीत आहेत.

‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी बसची सोय

मतदान साहित्य घेऊन केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. पण, माळशिरस, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, करमाळा या दूरवरील तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांना शेकडो किमीचा प्रवास करून दुसऱ्या तालुक्यात येऊन तेथून बसगाडीने मतदान केंद्रांवर जावे लागणार आहे. त्या काहींनी पदरमोड करून त्याठिकाणी येवू शकत नसल्याचे जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी (ता. ३०) बैठक पार पडली असून आता त्या दूरवरील कर्मचाऱ्यांना थेट मतदान केंद्रांवर नेण्यासाठी स्वतंत्र बसगाड्यांची सोय करण्यासंदर्भातील निर्णय उद्या (बुधवारी) होणार आहे.

‘ईव्हीएम’वर उमेदवारांच्या नावाचे सेटिंग

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २१ तर माढा लोकसभेसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्रांवर दोन दोन बॅलेट मशिन (युनिट) असणार आहेत. मतदानाला सात दिवसच शिल्लक असल्याने आता प्रत्येक मशिनवर उमेदवारांची नावे व चिन्हांचे सेटिंग करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT