नागपूर : आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर सडकून टीका केली आहे. कालच्या मेळाव्यात ना विचार होता, ना सोनं होतं. केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं वक्तव्य निघेल, असं त्यांनी म्हटलंय. तसेच बेईमानी करुन हे सरकार सत्तेवर आलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री व्हायची छुपी महत्त्वाकांक्षा होती आणि महाराष्ट्राचा बंगाल आम्ही होऊ देणार नसल्याचं ठाम विधान त्यांनी केलंय.
बेईमानी करुन सत्तेवर आलेलं सरकार
फडणवीसांनी म्हटलंय की, तुम्ही जनतेच्या मताशी बेईमानी करुन सत्तेवर आला आहात. जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं होतं आणि तुम्हाला वरपास केलं. हे सरकार बेईमानी करुन सत्तेवर आलं आहे.
मुख्यमंत्री व्हायची छुपी महत्त्वाकांक्षा
पुढे ते म्हणाले की, उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवावा. मुख्यमंत्री व्हायची त्यांची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करावं. महत्वाकांक्षा असणं चूक नाही, मात्र त्याागे खोटं तत्वज्ञान उभं करणं चूक आहे. त्यांना दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे अशा कुणाही शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं? असा सवालही त्यांनी केला आहे. तुमची महत्त्वाकांक्षा आहे म्हमून तुम्ही बेईमानीनं मुख्यमंत्री झालात, असं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही
पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्राचा बंगाल करायचंय या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांनी विचारलंय की, आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय म्हणालात, म्हणजे काय करायचंय? बंगालमध्ये युनियनबाजीमुळे एकही उद्योग टीकला नाही. कोलकात्याची सध्या अवस्था काय आहे, ती पहा! बंगाल करायचाय म्हणजे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचे हातपाय छाटायचेत. असा महाराष्ट्र करायचाय का? आम्ही काहीही होवो, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. कोणत्याही पातळीवर भाजप त्याचा विरोध करेल, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय.
संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काल संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उचललं. आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबे व्यक्त केलेत. हे संविधान कोण बदलू शकणार नाही. काही कम्युनिस्ट आणि डाव्या पक्षांन सोबत घेऊन हा छुपा अंजेडा, हा मनसुबा आहे मात्र, तुमचा हा मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.
काही केलंय त्याला ईडी सीबीआयचं भय
ईडी आणि सीबीआय का येतीय? ती आम्ही नाही आणली. ती हायकोर्टाने आणली आहे. ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करताय, ते राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार असून त्याची इतिहासात नोंद होईल. शोषण हाच या सरकारचा एकच उद्देश आहे. शेतकऱ्याला फसवणारं हे सरकार आहे. राज्याचे प्रमुख म्हणून आयटी विभागाच्या रेडमधून त्यांनी जे सांगतिलंय त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर दलाली सुरुय. काही मंत्र्यांकडे वसूलीचं सॉफ्टवेअर तयार केलं गेलंय. कुणाकडून किती वसूली हे नियोजन करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातंय. ज्यांनी काही केलंय त्याला ईडी सीबीआयचं भय असेल, असं त्यांनी म्हटलंय.
मोदी केंद्रीय एजन्सींच्या वापराच्या विरोधात
पंतप्रधान मोदी केंद्रीय एजन्सीच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत. ते कधीच गैरवापर करत नाहीत. मध्ये येत नाहीत. राजकीय वापर जर केला असता तर तुमचं अर्धं मंत्रीमंडळ आज तुरुंगात असतं. मागच्या काळात काँग्रेस आणि इतर पक्षांनी दुरुपयोग केला तसा आम्ही कधीच करणार नाही. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.
एक नंबरचा पक्ष आम्हीच
भाजपला नामोहरण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आमचा पायवा इतका भक्कम आहे की त्याच्या जोरावर आम्ही उभेच राहू आम्हीच एक नंबरचा पक्ष राहू. सरकार पाडून दाखवा म्हणणाऱ्यांना काम करुन दाखवाचं असं प्रत्त्युत्तर फडणवीसांनी दिलंय. ड्रग्जच्या रॅकेटवर कारवाई होत असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा. तुम्ही ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांच्या सोबत आहात की त्यांच्या विरोधात, असा सवालही त्यांनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.