राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये पाच हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, दोन हजारांहून अधिक व्हेंटिलेटर आणि आवश्यकता पडल्यास ऑक्सिजनचे ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे.
प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात ३० हजारांहून अधिक चाचण्या होऊ शकतात. यावेळी महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यंत्रणा सज्ज ठेवा!
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित अधिष्ठात्यांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचे निर्देश द्यावे. शिवाय ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. तसेच रुग्णालयात औषधे, खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी सुविधा सज्ज ठेवाव्यात. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.