Uday Samant News : गुजरातमधील वस्त्रोद्योग व्यावसायिक महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करीत आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इनसेंटिव्ह दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.(Uday Samant statement Will give huge incentives to textile industries investing in the state nandurbar news )
जनरल पॉलीफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, जिल्हा औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक, तसेच नवापूर टेक्स्टाईल इंडस्ट्रियल असोसिएशनबरोबर झालेल्या कार्यक्रमात ते शुक्रवारी (ता. २०) बोलत होते.
या वेळी आमदार शिरीषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती संगीता गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, अधीक्षक अभियंता झंजे, कार्यकारी अभियंता गणेश वाघ, जनरल इंडस्ट्रीजचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, की उद्योजकांना प्रोत्साहन देताना ज्या आदिवासी बांधवांनी नवापूरच्या टेक्स्टाईल पार्कच्या विकासासाठी जमीन दिली, त्यांनाही रोजगार देणे बंधनकारक असल्याच्या सूचना संबंधित उद्योग व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच, येथील आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रत्येक होतकरू तरुण बेरोजगारांना उद्योग विभागाच्या ‘एमआयडीसी’तर्फे मोफत दिले जाईल.
त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठविल्यास त्याला जलदगतीने तत्काळ मंजुरी दिली जाईल. नवापूर टेक्स्टाईल इंटस्ट्रियल असोसिएशनने आपल्या अडचणी व त्यावरील शासनाकडून असलेल्या अपेक्षा या वेळी व्यक्त केल्यावर उद्योगमंत्री म्हणाले, की नवापूर टेक्स्टाईल पार्कमध्ये ७०० मीटरच्या रस्त्याची असलेली मागणी आजच मंजूर करीत असून, वीजपुरवठ्यासाठी येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर केल्या जातील.
तसेच, नंदुरबार औद्योगिक क्षेत्रात १२ दशलक्ष लिटरची पाणी योजना ही १८ ते २० दशलक्ष लिटर करण्यास तत्काळ मान्यता देताना नंदुरबारच्या औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सेवा-सुविधांच्या विकासासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसून, येथील उद्योग आणि रोजगार हातात हात घालून विकसित व्हावेत, यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन या वेळी मंत्री सामंत यांनी दिले.
ते म्हणाले, की जनरल उद्योगसमूहाने आपल्या ८०० कोटींच्या गुंतवणुकीत एक हजार २०० कोटींची अधिकची तरतूद करून नवापूरमध्ये पाच हजार लोकांना रोजगार मिळावा, यासाठीचे नियोजन करावे. या वेळी नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, उपस्थित उद्योजक, उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी मंत्री सामंत यांनी सकारात्मक चर्चा केली.
दृष्टिक्षेपात उद्योगमंत्री...
- राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इनसेंटिव्ह देणार
- जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासींना उद्योगांवर रोजगार देणे बंधनकारक
- आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार
- उद्योगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्थानिकांमध्ये निर्माण करणे, जनजागृती करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी उचलावी
- केवळ उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच कामगारांचे हित शासन जपणार
- या सरकारच्या काळात उद्योगांना आजपर्यंत सुमारे साडेसात हजार कोटींचा इनसेंटिव्ह
- औद्योगिक प्रगतीत आज महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून समोर येतेय
- आपले उद्योग बाहेरच्या राज्यात गेले, अशा वावड्या उठविणाऱ्यांसाठी नवापूरच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये येऊ पाहावे
- गुजरातमधील उद्योजकांची गुंतवणूक हे चोख उत्तर
- नवापूरच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना भरघोस इनसेंटिव्ह देणार
- नवापूर, नंदुरबारच्या औद्योगिक विकासासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.