Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : दानवे यांचे निलंबन लोकशाहीला घातक;उद्धव ठाकरे,दानवेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंनी मागितली माफी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन हे षड्ःयंत्र रचून केलेले असून हा निर्णय लोकशाहीला घातक असल्याचा संताप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन हे षड्ःयंत्र रचून केलेले असून हा निर्णय लोकशाहीला घातक असल्याचा संताप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे जर माता बहिणींचा अपमान झाला असेल तर त्यासाठी मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागत असल्याचेही ठाकरे म्हणाले. तसेच विधान परिषदेतील आमचा विजय झाकोळून टाकण्यासाठी आणि त्यांच्या बोगस अर्थसंकल्पाची चिरफाड आमच्याकडून होऊ नये म्हणू हे निलंबन करण्यात आले असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात विधान परिषदेत सोमवारी खडाजंगी झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांबाबत अपशब्द वापरले. या प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत भाजपने अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. ठराव मांडताना सभापतींनी विरोधकांना कोणत्याही प्रकारच्या चर्चेची संधी न देता दानवेंचे निलंबन केले. दानवेंना त्यांची बाजू मांडू न देता निलंबन केल्याने उद्धव ठाकरे यांनी सरकारला खडे बोल तर सुनावलेच. पण दानवेंच्या वक्तव्याविषयी ठाकरे यांनी जाहीर माफीही मागितली.

मात्र त्याचबरोबर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींच्या सभेत भाऊ बहिणींच्या नात्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. त्यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेर्यासमोर शिवी दिली होती, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. हा माता भगिनींचा अपमान नाही का? महिलेवर अत्याचार केले म्हणून ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढले होते त्याला तुम्ही मंत्रिमंडळात जागा देताय, हा महिलांचा अपमान नाही का? सभागृहात केला तर अपमान आणि जाहीर केला तर अपमान नाही असे आहे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित करत सरकारला सुनावले.

ठाकरे म्हणाले, ‘‘अंबादास दानवेंनाही त्यांची बाजू मांडायची संधी द्यायला हवी होती. ती दिली नाही, आमच्याकडून कोणालाही बोलू दिले नाही. एक षड्ःयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करण्यात आले. सभागृहात जेव्हा एखादा प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्यावर चर्चा करणे व दुसरी बाजू मांडू देणे, हे लोकशाहीसाठी आवश्यक असते. त्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो. निलंबनाचा निर्णय सभापतींचा असतो पण एकतर्फी निर्णय हे लोकशाहीला घातक व मारक आहे. एका कुणाकडून मागणी झाली म्हणून निलंबन करणे हा लोकशाही विरोधी निर्णय आहे. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडले आहे. हा अन्याय आहे महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहत असल्याचेही ठाकरे म्हणाले.

‘त्या’ आमदारावरही कारवाई हवीः ठाकरे

दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद आज सभागृहाबाहेर देखील दिसले. गांधी यांच्या वक्तव्याचे ठामपणे समर्थन करत ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात चुकीच्या माहितीच्या आधारे ठराव मांडण्याचा प्रयत्न करणार्यां आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘‘त्या ठरावाचा संबंधच काय, असा प्रश्न दानवे यांनी केला होता, ते योग्यच होते. शिवाय राहुल गांधी काही चुकीचे देखील बोललेले नाहीत. जर असत्य माहितीच्या आधारे ठराव मांडणे हा देखील सभागृहाचा अपमान आहे. मग त्या सदस्याला देखील निलंबित करणार आहात का, असा प्रश्न उपस्थित केला.

राहुल गांधींचे विधान सत्यचः ठाकरे

‘‘मी स्वतः राहुल गांधींचे ते भाषण ऐकले. ‘भाजप म्हणजे हिंदुत्व नाही’ हे राहुल गांधी यांचे विधान सत्यच आहे. आमच्यापैकी कुणीही हिंदुचा अपमान करणे शक्य नाही. राहुल गांधींनी भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असे ठणकावून सांगितले आहे.’’ यात काहीही चुकीचे नसल्याची पाठराखण करत ठाकरे यांनी कॉँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे समर्थन केले. शिवाय चुकीच्या माहितीच्या आधारे बहुमताच्या बळावर ठराव मांडणार्यांच्या विरोधात ठराव मांडून त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल ठाकरे यांनी केला. संविधानाची शपथ घेतल्यानंतर ज्यांना मिरच्या झोंबल्या त्यांच्या विरोधात ठराव करुनही तो संसदेत पाठवा, असा टोलाही ठाकरेंनी मारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT