सोलापूर : मणिपूरमधील कुकी, मैथेई या दोन जातींमध्ये प्रचंड हिंसाचार धुमसत असताना सोलापुरात मात्र या दोन्ही जातींची मुले गुण्यागोविंदाने एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहतात. सोलापुरात या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा पुन्हा एकदा प्रत्यय येऊ लागला आहे. मणिपूरच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेल्या मल्लप्पा धनशेट्टी, अ. रसूल कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व श्रीकिसन सारडा या चार वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या प्रभुतींना १२ जानेवारी १९३१ रोजी इंग्रजांनी फासावर लटकावले. इतिहासात सोलापूरची ही नोंद महत्त्वाची ठरली आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून जातीय हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तेथील कुकी व मैथेई समाजात प्रचंड वैरत्वाची भावना असून ते एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. घरे-दुकाने जाळणे, गोळ्या घालून हत्या करणे, वाहने पेटविण्यासारखे दंगलीचे प्रकार दररोजच होत आहेत. अलिकडील काळात या प्रकारांवर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरीही अप्रिय घटना घडतच आहेत.
प्रचंड बिकट अशी सामाजिक स्थिती झालेली असताना सोलापुरात मात्र या दोन्ही जातीतील मुलांमध्ये उत्तम सलोखा नांदत असल्याचे चित्र आहे. शाळा, अभ्यास, क्रीडा, संगीत, प्राणायाम, योग, भोजन असा सारा दिनक्रम एकमेकांसोबत करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पाहिले की मणिपुरात दोन जातीतील हिंसाचाराचा आगडोंब व तणाव असेल यावर विश्वासच बसत नाही.
मणिपूरमधील मैथेई समाजातील चार, कुकी चार तर नागा समाजातील अकरा अशी १९ मुले सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनी केंद्रात एकत्र राहतात. ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्यवाह डॉ. अमोल गांगजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिवास प्रमुख अनंत अल्लिशे हे सहकुटुंब त्यांच्यासमवेत राहून शिक्षणाचे काम करीत आहेत. संगीतविषयक शिक्षणासाठी संदीप कुलक्णी तर क्रीडाविषयक मार्गदर्शनासाठी अनिल मुद्देबिहाळ त्यांना प्रशिक्षण देत आहेत.
बहुआयामी व्यक्तिमत्व
गेल्या तीन वर्षांपासून मणिपुरातील ही १९ बालके आता सोलापुरातील (महाराष्ट्रीय) वातावरणाशी एकरुप झालेली आहेत. संस्कृतमधील लिंगाष्टकम, जयोस्तुते असू दे की मुखोद्गद अशी मराठीतील प्रार्थना ते वाद्यवृंदाच्या साथीने सादर करतात. मकर संक्रांत, रक्षाबंधन, दिवाळी हे सण सोलापूरवासियांसोबत गुण्यागोविंदाने साजरे करत असतात. या मुलांनी बॉलबॅडमिंटन व फुटबॉलमध्ये जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला. गायन, हार्मोनियम, तबला, सतार, व्हायोलियन, बासरी वादनात ही मुले तरबेज झाली आहेत. संगिताच्या परीक्षा देऊन त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. विवेकवादी विचार व राष्ट्रवादातून भारताची उभारणी करण्याच्या दृष्टीने या मुलांवर संस्कार होत आहेत. ही मुले ई-लर्निंगच्या माध्यमातून संगणकावर सफाईदार बोटे फिरवितात. विज्ञान प्रयोगामध्येही यशस्वी कामगिरी करत आहेत. गणित, विज्ञान, इंग्रजी विषयात सरस असलेली ही मुले मराठीत कच्ची आहेत. त्यांना विशेष शिकवणी लावण्यात आली आहे. बहुआयामी व्यक्तिमत्वाची पायाभरणी या ठिकाणी होत आहे.
अनंत अल्लिशेंची धाडसी कामगिरी
मूळचे आष्टा कासार (ता. उमरगा, जि. धाराशीव) येथील अनंत अल्लिशे यांनी मणिपूरची मुले शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात यावीत, यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सतत तीन वर्षे ते यासाठी धडपडत आहेत. दंगलीच्या काळातही २२ तास प्रवास करुन मणिपूरच्या मुलांना त्यांनी सोलापुरात आणले आहे. हिंसाचाराचा आगडोंब पाहून पार हेलावून गेलेले श्री. अल्लिशे यांनी जीवावर उदार होऊन मणिपूरचा प्रवास केला. पण जिद्द सोडली नाही. तीन महिने मुक्काम ठोकून विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले. संवादावेळी भाषेचा प्रश्न होताच. पण त्यावरही त्यांनी मात केली. मणिपूरच्या चिराचांदपूर, उखरुल, थोबाल व तमेंगलाँग या चार जिल्ह्यातील १९ मुलांना त्यांनी सोलापुरात आणण्याचे धाडसच केले. पूर्वी मणिपूरच्या काही विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रात आणले होते, त्यांचा दुवा म्हणून उपयोग झाला.
विलगतावादाचा मोठा प्रश्न
प्रचंड विसंगत भौगोलिक परिस्थिती तसेच जाती-जातीत विसंवाद असलेल्या मणिपूरमध्ये गावागणिक भाषा व जमात बदलते. मुख्य पीक तांदूळ असून जेवणात भाताबरोबर कोणताही प्राणी चालतो. भांडणे, हाणामारी त्यातून मृत्यूचे प्रमाण अधिक. शिक्षणाचा अभाव असल्याने दुष्परिणामाची तमा नाही. भारतापासून हा भाग तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. उद्योग, व्यवसायांची कमतरता, विकासापासून कोसो दूर असलेल्या मणिपूरमध्ये मोबाईल टॉवरची संख्याही तोकडी आहे.
तिन्ही समाजातील मुलांना एकत्र ठेवून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरु
सीमावर्ती भागातील वनवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ज्ञानप्रबोधिनीची योजना आहे. त्यामध्ये मणिपूरमधील १९ मुलांना सोलापुरात आणण्यात आले आहे. शिक्षणाबरोबरच संगीत, क्रीडा, बौद्धीक तसेच शारीरिक विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. मणिपूरमधील नागा, कुकी व मैथेई अशा तिन्ही समाजातील मुलांना एकत्र ठेवून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरु आहे.
- अनंत अल्लिशेसह, निवास प्रमुख, ज्ञानप्रबोधिनी
------------------------------------------------------
फुटबॉलमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला
मणिपुरातील हिंसाचाराचा फटका आपल्या मुलांना बसू नये म्हणून काही पालकांनी आपली मुले सोलापूरला पाठविली आहेत. उत्तम क्रीडापटू तयार करण्याचे व्रत आम्ही घेतले आहे. फुटबॉलमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे.
- अनिल मुद्देबिहाळ, क्रीडा प्रशिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.