पाचोड (जि. छत्रपती संभाजीनगर) - राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली अन् पाणीटंचाईमुळे मोसंबीच्या बागांचे सरपण झाले. परिणामी, मराठवाड्यात मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाचोडच्या बाजारपेठेत दररोज मोसंबीची दीड कोटी रुपयांची होणारी उलाढाल आता केवळ दहा लाखांवर आली आहे.
आठ वर्षांपासून परराज्यासह परदेशात पसंती मिळविणाऱ्या मोसंबीला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेकडो रिकाम्या हातांना हंगामी स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, यंदाच्या तीव्र पाणीटंचामुळे तूर्तास हा काळ मोसंबी उत्पादकांसह मजुरांसाठी दगा देणारा ठरला. पाचोडसह पैठण तालुका मोसंबीचे आगार म्हणून परिचित होते.
या भागातील अर्थव्यवस्था मोसंबीसह शेती व्यवसाय व शारीरिक श्रमावर अवलंबून असून, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. तालुक्यात फळांची साडेआठ हजार, तर नवीन तीन हजार अशा एकूण साडेअकरा हजार हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, ही मोसंबी विक्रीसाठी येथील बाजारपेठेत येते.
प्रतिदिवस या बाजारात दोनशे ते पावणेतीनशे टनापर्यंत आवक होऊन एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असे. परंतु, आता पाणीटंचाईने मोसंबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले. तूर्तास मृग व हस्त बहाराची फळे तोडण्याचे काम वेगात सुरू झाले. येथे पन्नासवर नोंदणीकृत व्यापारी, अडत्यांची दुकाने आहेत. येथे पैठणसह गेवराई, अंबड, शेवगाव तालुक्यातील मोसंबी विक्रीसाठी येते.
तूर्तास मृग बहाराची फळे पंचवीस ते तीस हजार रुपये, तर हस्त बहर पंधरा ते वीस हजार रुपये प्रतिटन विक्री होऊन बाजारपेठेत ‘बोली’चे स्वर गुंजत असले, तरी सकाळपासून रात्री दहापर्यंत मार्केट यार्डात दिसणारी गजबज दृष्टीआड झाल्याचे दिसते.
जिल्ह्यातील बागांचे क्षेत्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र २३ हजार २८३ हेक्टर २० आर असून, डाळिंबाचे क्षेत्र ५ हजार ५१८ हेक्टर ४० आर, तर केळीचे ४७४ हेक्टर ४७ आर एवढे क्षेत्र आहे. जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन ३,३७,६०६.४० टन होऊन वार्षिक मोसंबी उत्पादनातून जिल्ह्यात सुमारे ४५० ते ६०० कोटींची उलाढाल होते, तर डाळिंबाचे उत्पादन १,२६,९२३.४० टन होते.
पाचोडला मोसंबीची बाजारपेठ सुरू झाल्याने शेकडो जणांना रोजगार उपलब्ध झाला होता. परंतु, पाणीटंचाईमुळे हजारो मोसंबीची झाडे वाळून गेली. रोज दीड कोटीच्या वर होणारी उलाढाल दहा ते वीस लाखांवर आली.
- सुनील बनसोडे, व्यापारी, मोसंबी मार्केड यार्ड.
राज्यासह परराज्यात मोसंबी पाठविण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईमुळे मोसंबीचे अर्थकारण रुतले गेले. बारमाही चालणारा हा व्यवसाय सर्वांसाठी पर्वणी काळ होता. पाणीटंचाईमुळे बागायतदार झाडांवरील अपरिपक्व फळे तोडून झाडांचे ओझे कमी करत आहेत. दिवसेंदिवस मोसंबीची आवक कमालीची घटत आहे.
- राजुनाना भुमरे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.
पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याच्या मोहात न पडता विविध प्रकारची आच्छादने वापरून फक्त झाडे कशी जगतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.