मुंबई : विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय झाल्यानंतरच विधानपरिषद सभापतींच्या निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या सदस्यांच्या नावांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, त्यांची नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. त्यांच्या नेमणुकीसंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आज अनेक खुलासे केले. महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या १२ आमदारांच्या नावांबाबत न्यायालयात अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे या वेळी त्यांच्या निदर्शनास आणले असता, ते म्हणाले, की मविआ सरकार गेले, त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सुद्धा गेले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव आता राहिलेला नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारने पाठविलेला सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव मान्य करायचा किंवा नाही याचा सर्वस्वी अधिकार राज्यपालांचा असतो. त्यामुळे तो प्रस्ताव आता राहिला नाही. पर्यायाने महायुती सरकारने पाठविलेला नवीन प्रस्ताव आता मान्य होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या गप्पांमध्ये सांगितले. आमच्या पक्षाचे ५४ आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली, म्हणजेच आमच्या पक्षाचे आता ५३ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त आम्हाला पाठिंबा दिलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता, आम्हाला विधानसभेला ६० पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात, अशी भूमिकाही पटेल यांनी यावेळी मांडली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटप झाले होते, विधानसभेचे जागा वाटपही सर्वेक्षणाच्या आधारावर होणार का, असे विचारले असता प्रत्येक पक्षाला सर्व जागांचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही विधानसभेसाठी सर्वेक्षण करणार असल्याचे पटेल यांनी यावेळी नमूद केले.
महायुतीतील तीनही पक्ष आपापले सर्वेक्षण करतील. प्रत्येकाचे सर्वेक्षण पाहिल्यानंतर जागा वाटपाच्या चर्चेला बसू, त्यात ज्या जागेबद्दल, पक्षाबाबत एकमत होईल ती जागा त्या पक्षाला देण्यात येईल. एकास दोन सर्वेक्षण असल्यास दोन सर्वेक्षण बाजूने असणाऱ्या पक्षाला ती जागा सोडली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपची मते अजित पवार गटाला मिळाली नसल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगताना आमच्या पक्षाला चार जागांवर वीस लाखांपेक्षा जास्त मते मिळावी आहेत. खडकवासला विधानसभा मतदार संघात आमच्या पक्षाला आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले. रायगडसह इतर मतदारसंघातही आम्हाला भाजपची मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. माढा आणि नगर लोकसभेची जागा आम्हाला मिळाली असती तर आज तिथे महायुतीचे खासदार असते, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबतही या मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता. हा निर्णय होताना आपण बैठकीतून बाहेर गेलो होतो, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
आमिष दाखविले नाही
विधान परिषद निवडणुकीत मतांची गणिते कशी जुळवून आणली याबाबत विचारणा केली असता, आता कोणालाही कोणतेही आमिष दाखवले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सर्वच उमेदवारांना केवळ नमस्कार केला. अनेकांशी माझे गेल्या चाळीस वर्षांचे संबंध आहेत, त्यामुळे उर्वरित मते जुळविण्यात यश आल्याचे अजित पवार सांगितले.
शिंदेंचीच गॅरंटी चालेल
आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय महायुतीत मोठा पक्ष असलेला भाजप घेईल, मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे त्यांचीच गॅरंटी चालेल, असे सांगून आगामी निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.