सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपत घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. त्यामुळे आमदार प्रणितींना प्रत्येक कार्यक्रमात मी कोठेही जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आवर्जून सांगावे लागले. सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले असून तीन-चार दिवसांत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते. तर भाजपनेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली असून दोन-तीन दिवसांत भाजपचाही उमेदवार अंतिम होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, मोहोळ, पंढरपूर- मंगळवेढा या पाच विधानसभा मतदारसंघात सध्या सत्ताधारी पक्षांचेच आमदार आहेत. शहर मध्य वगळता सर्वच ठिकाणी सत्ताधारी आमदार असतानाही भाजपला उमेदवार निश्चित करताना ताण काढावा लागत आहे. काँग्रेसने तरुण, आक्रमक चेहरा म्हणून प्रणिती शिंदेना मैदानात उतरविण्याची तयारी केली असून त्यादृष्टीने त्या कामाला देखील लागल्या आहेत. त्यांना यशस्वी टक्कर देणारा उमेदवार देताना भाजपने सोलापूर शहरातील सक्रिय कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीणमधील विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाहेरील उमेदवार दिल्यास फटका बसू शकतो, असाही काहींचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवार देण्याऐवजी आता शहरातील महापालिकेत नगरसेवक म्हणून उत्तम काम केलेला, पक्षाच्या कामात सक्रिय असणारा लोकाभिमुख नवीन चेहऱ्याला भाजपकडून संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
अडीच विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य निर्णायक
२०१४ प्रमाणे सध्या मोदी लाट नसल्याची जाणीव भाजप पदाधिकाऱ्यांना झाली आहे. मागील दोन्ही खासदारांबद्दलची नाराजी देखील त्यांच्यापर्यंत पोचली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी पक्ष निरीक्षकांकडे सोलापूर शहरातील उमेदवार देण्याची मागणी केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आता शहर उत्तर, शहर मध्य व दक्षिण सोलापूर विधानसभेचा जुळे सोलापूरसह त्याठिकाणचा शहरी मतदार, अशा अडीच मतदारसंघावर सर्वाधिक फोकस केला आहे. पक्षाला पंढरपूर-मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ या विधानसभा मतदारसंघात देखील चांगल्या मताधिक्याची आशा आहे. तरीपण, सोलापूर शहरातील अडीच विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य निर्णायक ठरणार असल्याने पक्षाकडून स्थानिकच उमेदवार दिला जाईल.
भाजपकडून ‘या’ उमेदवारांची नावे चर्चेत
सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात देखील पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या महिला उमेदवार असतील तर भाजपकडून माजी नगरसेविका संगीता जाधव यांनाही संधी दिली जाऊ शकते. याशिवाय अनपेक्षितपणे ग्रामीणमधील तिसरा उमेदवार देखील या मतदारसंघासाठी अचानक जाहीर केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.