मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आज मुंबईत पार पडल्या. यावेळी अजितदादांच्या बैठकीत त्यांनी शरद पवारांवर टीकाही केली. आधी भाजपसोबत जाण्यास नकार दिला नंतर शिवसेनेसोबत कसे गेले? असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला. पण त्यांच्या या प्रश्नाला शरद पवारांनी आपल्या बैठकीत उत्तरही दिलं. (Why NCP went with Shiv Sena difference between Shiv Sena and BJP Sharad Pawar reply to Ajit Pawar allegations)
शरद पवार म्हणाले, "आम्ही भाजपसोबत गेलो तर चुकलं काय? असं सांगताना त्यांनी सांगितलं की, नागलँडमध्ये भाजपसोबत जाण्यास तुम्ही परवानगी दिली. हो हे खरंय. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा नागालँड, मणिपूर हा संबंध भाग चीनच्या सीमेशी जोडणारा आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्ये आहेत तिथं अतिशय बारकाईनं विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. कारण जर राज्यात राजकीय गोंधळ असेल तर तिथं शेजारील देश गैरफायदा घेऊ शकतो. असं झालं तर त्याचा देशाला धोका असतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपण बाहेरुन पाठिंबा दिला. आपण त्या सरकारमध्ये गेलो नाही. पण राज्यात काय घडलंय ते सरकारमध्येच जाऊन बसलेत"
भाजपसोबत आम्ही गेलो यात काही चूक नाही, असं सांगितं जात आहे. पण जे जे पक्ष भाजपसोबत गेले त्यांचा इतिहास असा आहे की, अकाली दलासोबत भाजपचं सरकार चाललं नाही. पंजाबमध्ये भाजपचं ज्यांच्याशी सहकार्य होतं त्या पक्षाची एकजूट उध्वस्त केली. तेलंगाणा, आंध्र प्रदेश, बिहार अशी अनेक राज्ये आहेत जे भाजपसोबत सत्तेत आले त्यात सरकार काही दिवस ठिकठाक चालतं पण नंतर सहयोगी पक्ष उद्धवस्त केला जातो. त्यात फूट पाडली जाते. हेच भाजपचं सूत्र आहे. त्यामुळं आज तुम्ही जायचं ठरवलं आहे तुम्हाला लोकशाही त्याचा अधिकार आहे. पण चर्चा करुन हा निर्णय घेतला असता तर अधिक बरं झालं असतं. त्यामुळं हे लक्षात ठेवा देशातील इतर राज्यांमध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही, असा इशाराही यावेळी शरद पवारांनी अजितदादांना दिला.
त्याचबरोबर आज असंही सांगितलं जातं की, आम्ही भाजपसोबत गेलो त्यात काही चूक नाही. कारण तुम्ही शिवसेनेत गेलात. पण शिवेसना आणि भाजपत फरक आहे. कारण आणिबाणीच्या काळात संबंध देशात इंदिरा गांधींच्या विरुद्ध वातावरण होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे. त्यामुळं त्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांना सहकार्य केलं. सहकार्य इथंपर्यंत केलं की विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात लागली तेव्हा शिवसेनेनं काँग्रेसविरोधात एकसुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. का? तर आणिबाणीनंतर एक वेगळं वातावरण होतं. त्यात आणखी कटुता वाढू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता.
फक्त मनोहर जोशी आणि आणखी दोन लोकांना विधीमंडळात जागा दिली. बाकी काहीही केलेलं नव्हतं. म्हणजेच इंदिरा गांधींच्या काळातही काँग्रेसला शिवसेनेनं पाठिंबा दिला आणि आज असं सांगितलं जातं की, तुम्ही शिवसेनेबरोबर गेलात आम्ही भाजपसोबत गेलो तर काय बिघडलं. शिवसेनेचं हिंदुत्व आहे पण ते लपवून ठेवत नाहीत. त्यांचं हिंदुत्व हे अठरापगड जातींना घेऊन जाणार हिंदुत्व आहे. तर भाजपचं हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी, आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणार आहे. माणसामाणसात अंतर वाढवणार विद्वेष वाढवणार आहे.
मधल्या काळात राज्यातील विविध भागात दंगली झाल्यात. हे सर्व देशाला माहिती आहे की जाणीवपूर्वक या दंगील केल्या गेल्या. जिथं आपली सत्ता नाही तिथं समाजात विद्वेष वाढवायचा त्याचा राजकीय फायदा घेता येईल का? हे भाजपकडून केलं गेलं. पण ज्यामुळं समाजाच्या ऐक्याला तडा जातो. जो जातीय, धर्मात अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळं जो राष्ट्रप्रेमी नाही त्यांच्यासोबत जाण्याची आम्ही भूमिका घेणार नाही, अशी भाजपविरोधी स्पष्ट भूमिका यावेळी शरद पवारांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.