सोलापूर : माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ येतात. सोलापुरातील ‘शहर मध्य’ वगळता उर्वरित १२ विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचेच आमदार आहेत. तरीदेखील दोन्ही ठिकाणच्या भाजप उमेदवाराला विजयाची चिंता सतावत असल्याची सद्य:स्थिती आहे. मतदारसंघातील नाराजी व मागील १० वर्षातील विकासकामे आणि विशेष बाब म्हणजे ओसरलेली मोदी लाट, यामुळे आता दोन्ही उमेदवारांना विजयासाठी ताण काढावा लागणार आहे.
राज्यात भाजप, शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सत्तेत आहे. त्यांच्यासोबत प्रहार, रासप, रिपाइं (रामदास आठवले गट) असे मित्रपक्ष देखील आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी केवळ एकमेव आमदार प्रणिती शिंदे याच विरोधी पक्षातील आहेत. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याच सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात सहापैकी पाच आमदार महायुतीचे असून आपला उमेदवार सहजपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील व रामराजे निंबाळकर यांची नाराजी कायम आहे. राज्यात महायुती असतानाही भाजपला या दोन नेत्यांची नाराजी परवडणारी नसल्याने त्यांची समजूत काढणे सुरूच आहे. १० वर्षात केंद्रात तर राज्यात साडेसात वर्षे सत्ता असतानाही दोन्ही मतदारसंघातील विजयासाठी महायुतीला तथा भाजपला मतांची जुळवाजुळव करावी लागत असून वरिष्ठ नेते प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन करीत असल्याची चर्चा आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आमदार...
१) अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
२) दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख (भाजप)
३) शहर उत्तर : विजय देशमुख (भाजप)
४) पंढरपूर- मंगळवेढा : समाधान आवताडे (भाजप)
५) मोहोळ : यशवंत माने (राष्ट्रवादी- अजित पवार गट)
६) शहर मध्य : प्रणिती शिंदे (काँग्रेस)
माढा लोकसभा मतदारसंघातील आमदार
१) माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी- अजित पवार गट)
२) करमाळा : संजय शिंदे (अपक्ष- महायुतीसोबत)
३) माळशिरस : राम सातपुते (भाजप)
४) सांगोला : शहाजी पाटील (शिवसेना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट)
५) माण-खटाव : जयकुमार गोरे (भाजप)
६) फलटण : दीपक चव्हाण (राष्ट्रवादी- अजित पवार गट)
महायुतीतील घटक पक्षांकडून किती मदत?
सांगोला, माळशिरस, करमाळा, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, शहर मध्य अशा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे विजयाचे स्थानिक आखाडे वेगवेगळे आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यापूर्वी २०१९ची निवडणूक लढताना आताचे विरोधक त्यावेळी मित्र होते. दरम्यान, सध्या राज्य पातळीवरील राजकारण बदलले असले तरी आमदारांना स्थानिक पातळीवर पूर्वीच्या मित्रांना नाराज करून जमत नाही, नाहीतर विधानसभेला अडचणी येवू शकते. भाजप असाही काही दिवसांपूर्वी झालेला मित्र असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघात कोणता नेता (आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, माजी सदस्य) कोणाला मदत, यावर विजयाचे संपूर्ण गणित अवलंबून असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.