कोरोनामुळे(Covid 19) मानवाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी पशुपक्ष्यांवर (animals)त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. उलट कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाउन त्यांच्या पथ्यावर पडला आहे. ओसाड रस्ते, ठप्प झालेली वाहनांची वर्दळ व अचानक पसरलेल्या शांततेमुळे घराशेजारी राहणाऱ्या पक्ष्यांचे आवाज स्पष्टपणे ऐकू यायला लागलेत. कधीही न बघितलेले पक्षी अवतीभोवती बिनधास्तपणे फिरत आहेत.सकाळचे उपसंपादक सुनील गावडे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या या सुंदर अश्या आपल्या आवती भोवती असणाऱ्या पक्ष्यांविषयी जाणून घेऊया.
(world-environment-day-special-covid-positive-bird-impact-kolhapur-news)
पक्षी हा पर्यावरणातील खूप महत्वाचा घटक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यात ते सिंहाची भूमिका बजावतात. परंतु, वाढते नागरीकरण, वृक्षतोड, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, मोबाईल टॉवर, शिकारीचे वाढते प्रमाण, अधिवास नष्ट होणे आदी कारणांमुळे पक्षीजीवन धोक्यात आले आहे. पक्ष्यांच्या अनेक जातीनष्ट झालेल्या आहेत. काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपण वेळीच सावध झालो नाही तर पुढच्या पिढीला चित्रातून पक्ष्यांचे दर्शन होईल. पण, आपण त्यांना जगण्यासाठी आधार देऊ शकतो. परसबागेत पाणपोईची व्यवस्था केली तर पक्ष्यांची तहान भागेल. घरच्या घरी पक्षी निरीक्षणाची संधी मिळेल. विविध पक्षी, त्यांच्या हालचाली, आवाज आदींची माहिती होईल. पाण्यासोबतच शक्य असेल तर अन्नाचीही व्यवस्था आपण करु शकतो. मुख्य म्हणजे प्रत्येकाने एक रोप लावून वाढवले तर स्वतःबरोबरच पक्ष्यांचाही फायदा होईल.
का वाढला किलबिलाट?
मुबलक मिळणारे जलीय अन्न, निर्भय वातावरणामुळे उन्हाळ्यात प्रजनन व वीण करणाऱ्या पक्ष्यांसाठी लॉकडाउनचा हा काळ पोषक व सुरक्षित बनला आहे. रस्त्यावरील मानवी वर्दळ कमी झाली आहे. वाहनांचे आवाजही थांबले. यातून पशुपक्ष्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांच्या मुक्त वावराचा परीघ आपसूकच वाढला आहे.
खंड्या (White Throated Kingfisher) : हा लहान आकाराचा पाणथळी जागेजवळ राहणारा पक्षी आहे. अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. जलाशय किंवा पाणथळ जागेतील बिळात याचे घरटे असते. त्यात मादी 5 ते 7 अंडी घालते.दयाळ (Oriental Magpie Robin) : बुलबुलाएवढा असलेला दयाळाचे काळ्या-पांढऱ्या रंगाचा असतो. डोके व मान गडद काळ्या रंगाचे असतात. घरटे गवत, मुळे व केसांपासून बनविलेले असते. त्यात मादी पाचपर्यंत अंडी घालते. हा पक्षी फार सुंदर गातो.फुलटोचा (Pale Billed Flowerpecker):चिमणीपेक्षा लहान असलेल्या या पक्ष्याचा वरील भाग हिरवट तपकिरी तर पोटाकडचा भाग राखाडी वा मळकट पांढरा असतो. चोच फिकट गुलाबी पण बाकदार असते. याचे घरटे शिंजीरासारखे लटकते व बटव्यासारखे असते. त्यात मादी दोन अंडी घालते.राखी वल्गुली (Great Tit) : राखी वल्गुली हा पक्षी आकाराने चिमणीएवढा असतो. पाठीकडून राखाडी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, गाल, कंठ आणि छाती पांढर्या रंगाची तर पंखावर तुटक पांढर्या-काळ्या रेषा असतात. गवत, पिसे वापरुन झाडाच्या ढोलीत किंवा कडेकपारीत घरटे बांधले जाते. मादी एकावेळी ८ ते १० अंडी देते. वंचक (ढोकरी) (Indian Pond Heron) : बगळ्यासारखा दिसणारा हा पाणपक्षी आहे. बसलेला असला की मातकट दिसतो. तर उडू लागला की पंख पांढरे दिसतात. विणीच्या काळात त्याच्या पाठीवर किरमिजी रंगाची केसांसारखी सुबक पिसे दिसतात. डोक्यावर लांब पांढरा तुरा येतो. तळी, दलदलीची जागा, भातशेते ही याची निवासस्थाने आहेत.लालगाल्या (शिपाई) बुलबुल (Red Whiskered Bulbul) : शिपाई बुलबुल पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा व पोटाकडून पांढरा असतो. डोके काळे असून त्यावर मोठा टोकदार काळा तुरा असतो. डोळ्यांजवळ लाल कल्ले, गालावर पांढरा पट्टा व लाल रंगाचे बूड असते. घरटे बहुधा एखाद्या झुडपात असते. मादी एकावेळी 2 ते 4 अंडी देते.वेडा राघू (Green Bee-eater) : आकाराने चिमणीएवढा असलेला वेडा राघू हिरव्या रंगाचा पक्षी आहे. त्याची मान व डोके लालसर तपकिरी असून शेपूट लांबुळकी असते. गळ्यात काळ्या रंगाचा पट्टा ठळकपणे दिसतो. मातीत आडव्या खणलेल्या बिळात मादी 4 ते 7 अंडी घालते.शिंपी (Tailor Bird) :चिमणीपेक्षा थोडा लहान असलेला शिंपी देखणा पक्षी आहे. पिवळसर हिरवट रंगाचे शरीर, विटकरी रंगाचे डोके, पोट व छाती पांढरट असते. शेपूट झेंड्यासारखे वर उचललेले असते. झुडपात दोन पाने एकत्र आणून हा घरटे बनवितो. त्यात मादी 3 ते 4 अंडी घालते.साळुंकी (Common Myna) : साळुंकीची पाठ गडद तपकिरी तर मान, डोके व तोंडावळा काळा असतो. चोच चकचकीत पिवळी असून पाय पिवळे असतात. पंखात असलेली पांढरी पिसे पंख मिटलेल्या अवस्थेत दिसत नसली तरी उडताना स्पष्ट दिसतात. घरटे काड्या, कागद, चिंध्यांचे असते. मादी ४ ते ६ निळसर हिरवट अंडी घालते.
सुभग (Common Iora) : सुरेल गळ्याचा सुभग चिमणीएवढा लहानसा पक्षी आहे. रंग पिवळा असून डोके, पाठ व शेपूट काळे असते. पंखांवर दोन पांढऱ्या रंगांची ओळ असते. मादी थोडी फिकट असते. घरटे गवत व मुळ्यांपासून बनविलेले कपासारखे असते. त्यात मादी 2 ते 4 अंडी घालते. होला (Little Brown Dove) : मैनेपेक्षा थोडा मोठा असलेला होला हा फिकट तपकिरी-गुलाबी रंगाचा असतो. गळ्याच्या वरच्या बाजूला दोन्हीकडे काळपट पट्टे असतात. झाडाझुडपावर काटक्यांचे घरटे बांधून त्यात दोन पांढरी अंडी घालतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.