tribal google
महाराष्ट्र बातम्या

VIDEO : आदिवासी समाजाच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ केली जातेय का?

भाग्यश्री राऊत

नागपूर : वन अधिकार कायदा आणि पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींना अनेक हक्क बहाल करण्यात आले आहेत. जंगल, जमीन, ते राहत असलेला परिसर या सर्वांचं संरक्षण हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यावर कोणीही गदा आणू शकत नाही, बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये, असे या कायद्याअंतर्गत म्हटले आहे. मात्र, आज खरंच आदिवासी समाजाच्या अधिकारांची (rights of tribal community) अंमलबजावणी होत आहे का? तसेच आदिवासी म्हटलं तर सर्वांना अंधश्रद्धा आठवते. पण, ही अंधश्रद्धा हळूहूळ का होईना कमी होत आहे. पण, याशिवाय त्यांची एक वेगळी संस्कृती (tribal community culture) आहे. त्यांच्या याच संस्कृतीमध्ये बाहेरील लोक ढवळाढवळ (interference in tribal culture) करत आहेत का? हे शोधण्याचा 'ई सकाळ'ने प्रयत्न केला.

आदिवासी समाजाच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ होतेय का? हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आदिवासी संस्कृती काय आहे? हे आपल्याला पाहावं लागेल.

मातृसत्ताक संस्कृती -

आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक आहे. आईला म्हणजेच स्त्रीला सर्वाधिक महत्वं आहे. जन्म, लग्न, मृत्यू, रुढी-परंपरा, प्रथा त्यामध्ये स्त्रीला पहिलं आणि तितकंच मानाचं स्थान आहे. आदिवासी समाजात कधीही वंशाच्या दिव्यासाठी अट्टाहास केला जात नाही. मुलगी झाल्यानंतर तिच्या जन्माचा आनंद व्यक्त केला जातो. पाच किंवा सहा मुलीनंतर पुन्हा मुलगीच झाली तरी ''आली बेटी, झाली बेटी, धनाची सापडली बेटी'' असे गीत गात तिच्या जन्माचं स्वागत करतात.

मुलीला वाढवताना देखील कधीच दुय्यम लेखले जात नाही. तिने घरचे सर्व कामे करावी, असे बंधन घातले जात नाही. मुलगा-मुलगी दोघांनाही समान मानले जाते. सर्वोच्च शक्ती सल्लागागराला मानले जाते. सल्लागागरा म्हणजे मातृ-पितृ शक्ती. त्यापासून आपण जन्म घेतला आहे. म्हणजे ती आपल्यासाठी सर्वोच्च शक्ती आहे. या समाजामध्ये देव ही संकल्पना नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा थोर पुरुष ज्यांचा मृत्यू झाला त्यांना गुरू मानले जाते. या समाजामध्ये मूर्तीपूजा नाही.

आदिवासी नृत्य करताना या समाजातील महिला

पतीचा मृत्यू झाल्यानंतरही महिलेला विधवा समजलं जात नाही -

आदिवासी समाजातून पुढे आलेल्या ज्येष्ठ साहित्यिका उषा किरण आत्राम सांगतात, ''या संस्कृतीमध्ये स्त्रीला स्वतःच्या मनाप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तिला ते स्वातंत्र्य आहे. तिला एखादा मुलगा आवडला की ते गोटूलमध्ये जातात. त्यानंतर आपल्या विरोधी गणातील मुलाशी तिला लग्न करता येते. नवऱ्याच्या नावाने कुंकू लावणे, बांगड्या घालणे म्हणजेचं आपण जे सौभाग्याचं लेणं म्हणतो ते या संस्कृतीमध्ये नाही. सौभाग्यवती हा शब्द देखील या समाजाच्या शब्दकोशामध्ये नाही. तिला बरोबरीचे अधिकारी असतात. नवऱ्याला एकेरी शब्दातही ती बोलू शकते. महत्वाचे म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल तरी कधीही विधवा समजलं जात नाही. विधवा झाल्यानंतर तिला लग्न करण्याचा अधिकार असतो आणि ते देखील पहिल्यांदा ज्या पद्धतीने लग्न केलं जातं त्याच पद्धतीने हा पुनर्विवाह सोहळा देखील पार पडतो. नवऱ्यासोबत घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याचा न्याय समाजपंचायतमध्ये होते. दोघांचं पटत नसेल तर ती थेट समाजपंचायतमध्ये न्याय मागून वेगळी राहू शकते. तसेच त्यानंतर स्वतःच्या मनाने मुलगा निवडून लग्नदेखील करण्याचा अधिकार महिलेला आहे.

उषा किरण आत्राम, ज्येष्ठ साहित्यिका

निसर्ग सर्वोच्च श्रद्धेचं स्थान -

आदिवासींची निसर्गावर श्रद्धा आहे. डोंगर, नदी, पहाड, झाड, वेली या सर्वांना श्रद्धेचं स्थान मानतात. त्यामुळे ते या निसर्गाचं संरक्षण करतात. धरतीपासून त्यांना अनेक गोष्टी मिळतात. त्यामुळे धरतीला देखील माता मानले जाते. आदिवासींची मानसिकता ही संस्कृती जपण्याची आहे. जन्मजात त्यांना जे संस्कार मिळाले ते जपण्याची आहे. तो निसर्गाच्या सानिध्यात जगतो आणि निसर्ग हाच आदिवासींची देवता आहे. कारण निसर्ग कोणासोबतही बेईमानी करत नाही. त्याचप्रमाणे आदिवासी देखील निसर्गासारखे प्रामाणिक असतात. पण आदिवासी इतरांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांच्यात ते बदल होत गेलेत.

घरासमोर तंबाखूची पुडी ठेवून मांडायचे लग्नाचा प्रस्ताव -

आदिवासींच्या बोली भाषेचा अभ्यास करणारी पत्रकार शताली शेडमाके सांगतात, ''एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला, तर ती तंबाखूची पुडी नेऊन त्याच्या घराजवळ ठेवायची. त्याने तंबाखूची पुडी उचलली की समजायचं लग्नाचा प्रस्ताव मान्य केला. मुलाला एखादी मुलगी आवडली तर बांबूपासून एखादा कंगवा बनवायचा आणि तो तिच्या घरासमोर ठेवायचा. त्यानंतर तिने जर तो उचलून घरात नेला तर तिने लग्नाचा प्रस्ताव मान्य केला, असं समाजलं जात होतं. त्यानंतर ते दोघं गोटूलमध्ये जाऊन सांगायचं. तिथून त्यांचे गट पाहून संम्मती दिली जाते. कारण सम गटवाल्यांना सम गटातील मुलीसोबत लग्न करता येत नाही. ते एकमेकांचे भाऊ-बहीण लागतात. अशा गटात लग्न झाले तर मुलं विकलांग होण्याचा धोका असतो. त्यामुळे गोटूलमधून परवानगी मिळाली, की त्या मुलीच्या घरची परिस्थिती बघितली जाते. तिच्याकडे कोणी घरी कर्ता व्यक्ती आहे ते तपासले जाते. ती जर आई-वडिलांना एकटीच असेल तर मग मुलाने तिच्या घरी जाऊन राहायचे, अशी प्रथा आहे. त्या दोघांनाही आपल्या घरात राहायचं नसेल तर दोघांनाही ग्रामस्थ स्वतःच्या हाताने झोपडी बांधून देतात. या समाजामध्ये दोन व्यक्तींचं लग्न होत नाही, तर दोन गावाचं ते लग्न होतं. म्हणजे पूर्ण गाव सहभागी होऊ ते लग्न लावून देतात.''

शताली शेडमाके, बोली भाषेचा अभ्यास करणारी पत्रकार

आदिवासींच्या शब्दकोशात बलात्कार शब्द नाही -

शताली सांगतात, की आतापर्यंत मी बोली भाषेवर अभ्यास करत आले. मात्र, या भाषेत बलात्कार किंवा वेश्या असा शब्द अजून सापडलेला नाही. या समाजात स्त्रिया या पूर्ण कपडे घातलेल्या नसतात. तरी देखील पुरुषांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो. त्यामुळे बलात्कारसारखे प्रकार घडत नाही.

पण, याच माडिया आदिवासीमधील पहिले वकील, लालसू नगोटी सांगतात, की आधीपासून आमच्या समाजात बलात्काराचं एकही प्रकरण नाही. मात्र, बाहेरून येणारे लोक आणि इथं होणाऱ्या व्यावसायिकरणामुळे या समाजातील मुलींना आणि स्त्रियांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते आहे. ही खूप दुर्दैवी बाब आहे.''

लालसू नगोटे, पहिले वकील, माडिया आदिवासी समाज

आदिवासींच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न होतोय का? -

आदिवासींची अतिशय आदर्श अशी संस्कृती आहे. पण, त्यांच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ केली जातेय का? याबाबत याच समाजातून पुढे आलेल्या ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम सांगतात, ''आमच्या समाजातील काही लोक आम्हाला बदलविण्याचा प्रयत्न करतात. कारण ते सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालंचं मांजर असतात. आमची संस्कृती, भाषा बदलून, आमची जमिनी, आमचं जंगल घेऊन, आमची लुटमार करून, विस्थापित करून, सर्व हिसकावून घेऊन, आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा करतात. पण, याला फक्त मुख्य प्रवाह असं गोंडस नाव देऊन आमच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला जातो. आमची संस्कृती ही इतकी आदर्श असताना आम्ही आमची संस्कृती सोडायची का सोडायची? आम्ही आमचं जंगल का सोडायचं?''

याबाबत बोलताना याच समाजातील माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके म्हणतात, ''संस्कृती असो की धार्मिक ग्रंथ असो काळानुसार त्यांचं पुनर्मुल्यांकन व्हायला पाहिजे. त्यामध्ये आणखी काही मुल्यांची भर पडणे गरजेचे आहे. काळानुसार आपल्याला बदलायला पाहिजे. पण, आता आमचा समाज दारिद्र्य रेषेखाली जगतो आहे. त्याचाच फायदा घेऊन बाहेरचे लोक येऊन त्यांना प्रलोभन देतात. त्यांना घर, पैशांचं आमिष दाखवतात आणि त्यांचं धर्मांतर करून घेतात. भावनिक ओलावा निर्माण करून त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करतात. अन्न, वस्त्र, निवारा पुरवून प्रलोभन देतात. ते गरिबीमुळे बळी पडत आहेत.''

दरम्यान, अॅडव्होकेट लालसू नगोटे म्हणतात, ''कायद्यानुसार आमच्या जीवनात बाहेरच्या लोकांनी ढवळाढवळ करू नये. आमचे जल, जंगल, जमीन हिरावून घेऊ नये, असे अधिकार आम्हाला आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मातृभाषेतून शिक्षण घेता येत नाही. आमची बोली भाषा नष्ट होत आहे. दुसऱ्या धर्माचा आमच्या समाजामध्ये प्रवेश होत आहे. भाषा, संस्कृती नष्ट होत आहे.''

वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे काय? -

याबाबत वसंत पुरके म्हणतात, ''अन्न, वस्त्र, निवारा हे आदिवासींना मिळवून देणे. सर्वसामान्य लोक जसं जगतात तसं त्याला जगता आलं पाहिजे. जंगलात राहण्यापेक्षा तो मुंबई, नागपूर अशा शहराच्या ठिकाणी आला पाहिजे. आदिवासींना अज्ञानात राहू द्यायचं नाही. त्यामधून त्यांना बाहेर काढायचं आहे. आदिवासींना जंगलात राहू देणार नाही. त्याला शहराच्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. गरिबीवर मात करून सर्वसामान्यांसारखं आदिवासींनी जगलं पाहिजे. त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षणाने ते बदलू शकतात. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे.''

पण, याबाबत लालसू नगोटे सवाल उपस्थित करतात, आम्ही आमची बोली भाषा सोडून दुसरी भाषा बोलणे हा मुख्य प्रवाह आहे का? ज्याला मराठी येईल तोच मुख्यप्रवाहात आहे का? जंगलात राहणाऱ्यांना अडाणी समजले जाते. मात्र, तसं नाही. सरकारने आम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे, तर आम्ही राहतो त्याठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जंगलात राहूनही अनेकजण शिकत आहेत. त्यांच्यापर्यंत त्यांच्या परिसरात शिक्षण पुरविणे हे सरकारची जबाबदारी आहे.

तसेच सरकारने आम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आमचं जंगल तुटू नये, आमची भाषा आमच्यापासून दुरावली जाऊ नये. निसर्गासोबत असलेलं आमचं नातं तुटू नये, याप्रमाणे मुख्य प्रमाणात आणावे. कायद्याने आम्हाला संरक्षण मिळालं आहे. मग आम्हाला आमच्याप्रमाणे राहू द्या. कायद्याचं पालन करा. पण दुर्दैवाने कायद्याचं पालन होतं नाही. आमची संस्कृती वेगळी आहे. मग आमच्या संस्कृतीपासून आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा सवाल उषा किरण आत्राम उपस्थित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT