youth leader new direction to politics rohit pawar aditya thackeray satyajeet tambe rahul gandhi youth politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Youth Politics : युवा नेते देताहेत राजकारणाला नवी दिशा...

राज्यातील युवा नेत्यांमध्ये राजकारणापलीकडचे मित्रबंध; क्रीडा, उद्योजकता, पर्यावरणपूरक विकास या मुद्द्यांवर एकमत

सकाळ वृत्तसेवा

Youth Politics : राज्यातील राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांमध्ये चारित्र्यहनन, चिखलफेक, टीका अशा गोष्टींमध्ये चढाओढ सुरू असताना दुसऱ्या बाजूला सर्वच पक्षांमधील युवा नेते मात्र एकमेकांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध राखून आहेत.

हे नेते थोड्याबहुत फरकाने सारख्याच वयाचे तर आहेतच, पण त्यांचे विचार, आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रमही जुळत असल्याने पक्षभेद विसरून त्यांच्यात मैत्री आहे.

आपापल्या पक्षांचं प्रतिनिधित्त्व करताना मंचावर ते एकमेकांशी वाद घालताना दिसत असले, तरी त्यानंतर त्यांच्यातील सख्य सध्याच्या राजकीय वातावरणात सुखावणारं आहे.

महाराष्ट्राचं राजकारण गेली अनेक वर्षं पवार आणि ठाकरे या दोन नावांभोवती फिरतं. याच दोन कुटुंबातील दोन युवा नेते गेल्या दोन-तीन वर्षांत पुढे आले आहेत. भूतकाळात पवार-ठाकरे यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचं गाठोडं यांच्या खांद्यावर आहे.

पण आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हा भूतकाळ मागे सारून चहाच्या कपाभोवती सहज गप्पा मारताना दिसतात. आता या दोघांचेही पक्ष मित्रपक्ष असल्याने प्रसंगी दोघे एकमेकांच्या बचावासाठीही पुढे सरसावलेले अनेकदा पाहायला मिळाले आहेत.

कोरोना काळात रोहित पवार यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, तर आदित्य ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये मुंबईत उचलून धरलेल्या मुद्द्यांना तरुणांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे हेदेखील तरुण नेत्यांच्या मांदियाळीतील एक अग्रेसर नाव आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या सत्यजीत यांची विविध पक्षांमधील तरुण नेत्यांशी चांगलीच मैत्री आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तांबे यांच्यावर काँग्रेसने कारवाई करूनही त्यात काहीही फरक पडलेला नाही.

राज्यातील इतर तरुण नेत्यांच्याही ते संपर्कात असल्याचं पाहायला मिळतं. विविध पक्षांमधील तरुण नेत्यांशी संबंध असलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांचं नावही पुढे आहे. तर परदेशात शिक्षण केलेले काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील हे नाव देखील या यादीत जोडले जाते.

हे सर्व नेते विकासाच्या मुद्द्यावर काय विचार करतात, याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बहुजन विकास आघाडी पक्षाचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर!

हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड या दोन्ही विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेतलेले आ. क्षितीज ठाकूर त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या वसई-विरार भागात विकसित देशांप्रमाणेच पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.

विविध पक्षांमधील तरुण नेत्यांशी त्यांचा नियमित संपर्क असतो आणि त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आ. ठाकूर करत असतात.

या नेत्यांमध्ये आणखी एका अत्यंत तरुण नेत्याचं नाव समोर येतं. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील. फक्त २३ वर्षांच्या रोहित पाटील यांनी कमी वयातच ग्रामीण पातळीवर राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे.

विशेष म्हणजे आतापासून ते विविध पक्षांमधील तरुण नेत्यांच्या संपर्कात आहेत. या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावताना दिसतात. त्यांची भाषण करण्याची हातोटीही लोकांनी अनुभवली आहे.

कोविड-१९ च्या कठीण काळात या युवा नेत्यांचा कस लागला होता. पण या काळातही त्यांनी एकमेकांशी व्हीडिओ-कॉलद्वारे संपर्क साधून एकमेकांच्या भागांमधील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली.

आपण करत असलेल्या उपाययोजना इतरांना सांगून त्यांचे प्रयत्नही जाणून घेतले. कोरोनानंतरही हे नेते एकमेकांना अगदी अनौपचारिकपणे भेटताना दिसतात. त्यामुळे सध्याच्या चिखलफेकीच्या राजकारणाची दिशा हे नेते हळूहळू का होई ना, पण बदलताना दिसतात. राजकारणात असले, तरी त्यापल्याडचा स्नेहभाव या नेत्यांमध्ये असल्याचं आढळतं.

या नेत्यांपैकी अनेकांनी बाहेरच्या देशांमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. या कल्पना ते आपापल्या मतदारसंघांमध्ये किंवा प्रभावक्षेत्रांमध्ये राबवू इच्छितात.

त्यांच्यापैकी काही अमेरिका किंवा इंग्लड अशा देशांमध्ये काहीतरी नवीन शिकायला एकत्र जातात. त्यामुळे पक्षभेदापलीकडे जाऊन राज्याच्या विकासासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळही प्रकर्षाने जाणवते.

"वय हा या सगळ्या नेत्यांमधील समान धागा आहे. एकमेकांना भेटताना ते आपापले राजकीय मतभेद बाजूला सारून भेटतात. त्यामुळे त्यांच्यातील संबंध घनिष्ट व्हायला मदत होते. एकमेकांच्या कार्यक्रमांना किंवा वाढदिवसांना ते एखाद्या मित्राच्या वाढदिवसाला त्याच्याकडे जावं, एवढ्या सहजपणे जातात.

दुसऱ्या विचारधारेच्या पक्षाच्या नेत्यासोबत आपण दिसलो, तर त्याचे परिणाम काय होतील, काय राजकीय चर्चा होतील, वगैरे बुरसट विचारांमध्ये ते अडकलेले नाहीत. ही खरंच खूप आशादायक आणि सुखावणारी बाब आहे, असं एका राजकीय विश्लेषकाने गोपनीयतेच्या अटीवर सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT