सोलापूर : लातूरमधील नीट पेपरफुटीप्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षक संजय जाधव याचा हात असल्याचे आता उघड होवू लागले आहे. त्याला निलंबीत करण्यात आले आहे, पण या प्रकरणानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग ॲलर्ट झाला आहे. आता शिक्षकांसाठी स्वतंत्र नियमावली बनविण्यात आली असून गणवेशाच्या बंधनासह शिक्षकांच्या शाळेतील मोबाईल वापरावरील निर्बंधाचाही त्यात समावेश आहे. त्याबाबत लवकरच शिक्षकांना लेखी सूचना तर बैठकांमधून तोंडी सूचना देण्यात येणार आहेत. त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारीही करण्यात आली आहे.
‘नीट’प्रकरणी टाकळी टें (ता. माढा) येथील शिक्षक संजय जाधव याला ‘एटीएस’ने अटक केल्यानंतर त्याच्यावर गुरूवारी (ता. २७) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, तो लातूरमध्ये खासगी क्लास चालवायचा, त्यासाठी सहजपणे ये- जा करता यावे, यासाठी त्याने आंतरजिल्हा बदलीत टाकळी टें. येथील कमी पटसंख्येची शाळा निवडली होती. तसेच पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राद्वारे संवर्ग- एकमधून अक्कलकोट तालुक्यात बदली मिळविली होती. पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राची प्राधिकृत यंत्रणेकडून खातरजमा केली जात आहे.
तसेच त्याच्याकडून लातूरमध्ये चालवले जाणारे क्लास, नीट पेपर फुटीतील त्याचा सहभाग आणि १२ जूनपासून बेकायदा शाळेवरील त्याची गैरहजेरी, या बाबींची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी नियमावली तयार केली आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी पूर्ववेळ हजर राहणे, खासगी क्लास न चालविणे हे बंधनकारक असले तरी त्यात काही नव्या नियमांचा समावेश केला आहे. त्याबाबत शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी ‘अशी’ राहील नियमावली....
निर्धारित वेळेत पूर्णवेळ शाळेत हजर रहावे
शिक्षकांसाठी स्वतंत्र गणवेश निश्चित करणार
शाळेच्या वेळेत शिक्षकांना यावे लागणार गणवेशातच
शाळेच्या वेळेत विशेषत: अध्यापनावेळी मोबाईलचा वापर करता येणार नाही
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना चालविता येणार नाहीत खासगी शिकवणीचे वर्ग
झेडपी शिक्षकांसाठी आता स्वतंत्र नियमावली
शिक्षक संजय जाधव याचा नीट पेपर फुटीतील सहभाग आणि बेकायदा गैरहजर राहण्याची बाब गंभीर आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिक्षकांकडून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ गणवेशात हजर असावे. मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्यात येईल. त्यांना खासगी शिकवणी वर्ग चालवता येणार नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.