सोलापूर : जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या मागच्यावेळी ऑफलाइन पद्धतीने झाल्या होत्या. पण, आता बदल्यांचे सुधारित धोरण शासन निर्णयाने निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असून या बदल्यांमध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नसणार आहे. बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपूर्वी होतील, असेही त्या वेळापत्रकात नमूद आहे.
नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवर २५ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. त्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने शिक्षक बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यान्वित असावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करायची आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेला अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविली जाईल.
वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असणार आहे. संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरीत्या सुरू ठेवण्याची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा. लि. पुणे या कंपनीकडे राहील. एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही देखील होणार आहे.
शिक्षक बदल्यांचे नियोजित वेळापत्रक
शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध
१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी
रिक्त पदे निश्चिती
१ ते ३१ मार्च
समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चिती
२१ ते २७ एप्रिल
सर्वांना पसंतीक्रम भरणे व बदल्या
२८ एप्रिल ते ३१ मे
दरवर्षी ३१ मेपूर्वी शिक्षकांच्या बदल्या
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या यापुढे शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीनेच पार पडतील. विधानसभा निवडणुकीनंतर बदलीस पात्र शिक्षकांची माहिती संकलित करून निश्चित झालेल्या वेळापत्रकानुसार वरिष्ठांना पाठविली जाईल. दरवर्षी ३१ मेपूर्वी शिक्षकांच्या बदल्या होतील.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.